रिलीजपूर्वीच `पुष्पा 2`चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, `बाहुबली 2`, `RRR`आणि `KGF 2`ला टाकले मागे
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या `पुष्पा 2` चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे.
Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 3 वर्षांपूर्वी अल्लू अर्जुनने स्वत: ला फायर म्हटले होते. परंतु, आता तो 'वाइल्ड फायर' होऊन पुन्हा परत आला आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त 2 दिवस राहिले आहेत. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून जोरदार कमाई केली आहे. अशातच आता 'पुष्पा 2' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या किंमतीमध्ये देखील प्रचंड वाढ झालेली आहे. या चित्रपटाने 'बाहुबली', 'केजीएफ 2' आणि 'RRR' अशा चित्रपटांना कमाईच्या बाबतीत रिलीजपूर्वीच मागे टाकले आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाने 3 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत बॉक्स ऑफिसवर 37.59 कोटी रुपये अॅडव्हान्स बुकिंगमधून कमाई केली आहे. यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशीच अॅडव्हान्स बुकिंगमधून इतकी कमाई केली आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 22 हजार 215 शोसाठी 12 लाख 12 हजार 568 तिकीट बुकिंग झाली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटासाठीची क्रेझ ही सर्वात जास्त तेलुगूमध्ये दिसत आहे. कारण तिथे 18 कोटींहून अधिक अॅडव्हान्स तिकीट विक्री झाली आहे. हिंदी भाषेसाठी 12 कोटींहून अधिक तिकीट विक्री झाली आहे.
1 मिलियन पेक्षा जास्त तिकीटे बुकिंग
बुक माय शोवरती 'पुष्पा 2' चित्रपटाने आतापर्यंत 1 मिलियन पेक्षा जास्त तिकीटे बुकिंग केली आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. या चित्रपटाने 'कल्कि 2898 एडी', 'बाहुबली 2' आणि 'केजीएफ 2' या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने सर्वात कमी वेळात 1 मिलियन तिकीट विक्री करून नवीन इतिहास रचला आहे.
'पुष्पा 2' 'RRR' चित्रपटाला मागे टाकणार?
'पुष्पा 2' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचा आकडा पाहून असा अंदाज लावला जात आहे की, 'पुष्पा 2' हा चित्रपट एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाला मागे टाकू शकतो. 'RRR' हा देशातील पहिला चित्रपट आहे ज्याने अॅडव्हान्स बुकिंगमधून 58.73 कोटींची कमाई केली होती. हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 223 कोटींची कमाई करून एक रेकॉर्ड केला होता.