मुंबई : मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित 'अमलताश' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. आयुष्यातील विविध सुरांचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा चित्रपट अनेकांना भावतोय. प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा चित्रपट असून या चित्रपटाचे कौतुक केवळ प्रेक्षक, समीक्षकच नाही तर अनेक नामवंतही करत आहे. कलेची उत्तम जाण असणारा प्रत्येक व्यक्ती का कलाकृतीचे कौतुक करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर 'अमलताश'चे भरभरून कौतुक केले आहे. दिग्दर्शक रवी जाधव, निखिल महाजन, प्रकाश कुंटे, अमेय वाघ यांच्यासह अनेकांनी या चित्रपटाचे  कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, '' हा एक असा सुंदर मराठी चित्रपट आहे, ज्याला सौम्य सिनेमॅटिक टच आहे. यातील साधेपणा प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्रात आपण नकळत गुंततो. या कथानकातील विशेष आकर्षण म्हणजे सुमधुर संगीत. प्रत्येकाने आवर्जून पाहावा.असा हा चित्रपट आहे.'' तर दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' एक सुंदर संगीत चित्रपट आहे जो खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. प्रेम, मैत्री आणि एका शहराचे मर्म इतक्या प्रभावीपणे  पडद्यावर मांडण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी झाली आहे. तर प्रकाश कुंटे 'अमलताश'चे कौतुक करताना म्हणतात, '' चैत्राच्या आगमनाची चाहूल देऊन नावाप्रमाणेच छान फुललाय. प्रेम आणि संगीताविषयी फुललेली ही उत्कृष्ट कलाकृती चुकवू नका.'' तर अभिनेता अमेय वाघ म्हणतो, '' हा चित्रपट म्हणेज  भावपूर्ण सांगितिक अनुभव आहे, जो प्रत्येकाने जरूर अनुभवावा.'' 


सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.


हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसतेय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे 'त्या' कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.