महिन्याभरापूर्वी गोड बातमी देणाऱ्या सेलिब्रिटीचा गर्भपात; हे क्षण मन हेलावणारे
गरोदरपणाचा काळ हा वाटतो तितका सोपा नसतो
मुंबई : एखादी महिला गरोदर असते तेव्हा ती जीवनातील काही सुखद दिवसांचा अनुभव घेत असते. गरोदरपणाचा काळ हा वाटतो तितका सोपा नसतो. किंबहुना या दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला आव्हानात्मक प्रसंगांतूनही पुढे जावं लागतं.
सर्वच आव्हानं महिलांना तारून नेतातच असं नाही. एका लोकप्रिय सेलिब्रिटीच्या जीवनात अशाच प्रसंगाचं वादळ आलं आणि स्वप्नांचा बंगला एका क्षणात तुटला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून या सेलिब्रिटीनं तिच्या जीवनातील या आघाताची माहिती सर्वांना दिली आणि आनंद एका क्षणात दु:खात परावर्तित कसा झाला, याची माहिती दिली.
तिच्यासोबत जे घडलं, ते इतर कोणासोबतच घडू नये असंच म्हणत नेटकरीही या पोस्टवर व्यक्त होत आहेत. अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears) हिनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपला गर्भपात झाल्याचं सांगितलं.
(Britney Spears Miscarriage) ब्रिटनीनं एक पोस्ट लिहित, हा क्षण कोणत्याही पालकांसाठी हेलावणाराच आहे. 'खूपच दु:खानं सांगण्यात येत आहे, की गरोदरपणाच्या सुरुवातीच्याच काळात आम्ही आमचं बाळ गमावलंय. हे पालकांसाठी अतिशय मन हेलावणारं आहे.
बहुधा आम्ही एकत्र येत नाही, तोवर ही बातमी सर्वांना सांगण्यासाठी वाट पाहायला पाहिजे होती. आम्ही ही बातमी सर्वांसोबत शेअर करण्यासाठी फारच उत्सुक होतो... पण, सध्या मात्र आमचं एकमेकांसोबत असणंच मोठी ताकद ठरत आहे', असं तिनं लिहिलं.
आम्ही हे कुटुंब वाढवणं असंच सुरु ठेवू, पण या क्षणी आम्हाला काही शांततेच्या क्षणांची अपेक्षा आहे; अशी विनंतीही तिनं चाहत्यांना केली.
मागील महिन्यातच ब्रिटनीनं तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. वडिलांशी सुरु असणारी कायदेशीर लढाई संपल्यानंतरच तिनं ही गोड बातमी सर्वांना दिली. पर्सनल ट्रेनर असगरी याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे.
सॅम असगरी आणि ब्रिटनी यांची भेट 2016 मध्ये झाली होती. एका म्युझिक व्हिडीओ पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली होती.