बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
महानायक अमिताभ बच्चन हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. अलीकडेच, बीग बी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामागचं कारण म्हणजे यावेळी त्यांनी आपला बंगला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमिताभ बच्चन यांचा पहिला बंगला प्रतीक्षा बीएमसी तोडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच याविरोधात अमिताभ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेरचा रस्ता रुंद करण्यासाठी बीएमसीने दिलेल्या नोटीसवर हा अर्ज देण्यात आला आहे. या अर्जावर न्यायालयाकडून सुनावणी करत बीएमसीने या प्रकरणाचा विचार करावा आणि गरज पडल्यास अमिताभ बच्चन यांच्याशीही चर्चा करावी. असे न्यायालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र, या प्रकरणी बीएमसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काय आहे प्रकरण
संत ज्ञानेश्वर रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी त्यांच्या बंगल्याची भिंत तोडण्यात येणार आहे. हा मार्ग 'प्रतीक्षा' बंगल्यापासून सुरु होवून एस्कॉन मंदिराकडे जातो. जुहूमध्ये बच्चन परिवाराव्दारे खरीदण्यात आलेला प्रतिक्षा हा पहिला बंगला आहे. याशिवाय या भागात अमिताभ बच्चन यांचे आणखी तीन बंगले आहेत. जुहूच्या संत ज्ञानेश्वर मार्गाची रुंदीकरण सध्या केवळ ४५ फूट आहे. बीएमसीला त्याची रुंदी ६० फुटांपर्यंत वाढवायची आहे. जेणेकरून इथल्या होणाऱ्या ट्राफिकपासून सुटका होईल. याविरोधात अमिताभ बच्चन यांनी न्यायालयात धाव घेतली.