Video : ओळखणंही कठीण; KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकणारा `हा` लहानगा आज IPS अधिकारी
पाहा आज किती बदललंय त्याचं आयुष्य...
मुंबई : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत गेल्या कित्येक वर्षांपाहून लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा एक कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. बुद्धीचातुर्याच्या बळावर सर्वसामान्यांना पुढे आणत त्यांना कोट्यधीश होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यातच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाची जोड मिळाल्यामुळं कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत ढिगानं भर पडली. (Amitabh bachchans KBC Junior 1 crore winner is now serving as IPS did MBBS)
अशा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये 14 वर्षांचा एक मुलगा आला होता. 'केबीसी ज्युनियर' या पर्वात त्यानं उपस्थिती लावली होती. 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्यानं 1 कोटी रुपयांची रक्कम घरी नेली होती. रवी सैनी असं त्या हुशार पठ्ठ्याचं नाव.
केबीसीमध्ये येण्याचं त्याचं एकच ध्येय्य होतं ते म्हणजे बिग बींना भेटण्याचं. इतक्या कमी वयात त्यानं या कार्यक्रमाच्या मंचावर येत मिळवलेलं यश कौतुकास्तपद होतं. पुढे त्यानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या आणि सध्या तो आयपीएस हुद्द्यावर देशाच्या सेवेत रुजू आहे.
शालेय जीवनापासूनच 'नंबर एक'
शालेय जीवनापासूनच अव्वल असणाऱ्या रवीनं आयपीएस पदापर्यंत मजल मारलीच पण, त्यानं एमबीबीएसचंही शिक्षण घेतलं. जयपुर मधील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथून त्यानं वैद्यकिय शिक्षण घेत त्यानंतर त्यासंदर्भातील क्षेत्रात शिकाऊ म्हणून नोकरीही केली. पुढे त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत नव्यानं यश संपादन केलं.
वडील नौदलाच्या सेवेत असल्यामुळं त्यानं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत देशसेवेत येण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये त्यानं पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली. पण, त्यामध्ये तो अपयशी ठरला. पुढल्याच वर्षी त्यानं पुन्हा प्रयत्न केला आणि तो भारतीय टपाल खात्याच्या अकाउंट्स अँड़ फाइनँन्स विभागासाठी निवडला गेला.
2014 मध्ये रवीनं आणखी एकदा परीक्षा दिली आणि तो आयपीएससाठी पात्र ठरला. संपूर्ण देशात त्यानं 461 वा क्रमांक पटकावला. त्याचं हे यश आजही कौतुकाची थाप मिळवून जातं.
एकाएकी रवीची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे KBC चं नवं पर्व. 7 ऑगस्टपासून या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु होणार आहे. 14 व्या पर्वात आता नवं काय पाहायला मिळणार याचीच उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे.