मुंबई : 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेते अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेतून पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना विविध साहसी दृश्यही चित्रीत करण्यात येत आहेत. मात्र नुकत्याच चित्रीत केलेल्या एका थरारक स्टंटचा अनुभव अमोल कोल्हे यांनी शेअर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल कोल्हे यांनी या स्टंटचा फोटो शेयर करत पोस्ट लिहीली आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच बॅक फॉल स्टंट केला आहे. या स्टंटचा थरार आणि अनुभव त्यांनी या पोस्टमधून सांगितला आहे.  शिवकाळातील सर्जिकल स्ट्राईकच्या सीनसाठी हा स्टंट करण्यात आला होता.


आपल्या पोस्टमध्ये अमोल कोल्हे लिहीतात की, "आयुष्यात प्रथमच केलेला स्टंट- बॅक फॉल ! खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज साकारायचे म्हटलं की साहस दृश्य हा अविभाज्य भाग असतो. परंतु एवढ्या वर्षात एक स्टंट केला नव्हता तो म्हणजे बॅक फॉल. उंचावरून पाठीवर शरीर झोकून देणं. शक्यतो कलाकार हा स्टंट टाळतात कारण यात असणारा धोका, मानेला, कंबरेला, मणक्याला दुखापत होण्याची शक्यता!


 


पुढे अमोल कोल्हे लिहितात, "चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी एक्शन दिग्दर्शक रवी जी दिवाण यांचा फोन आला.. अमूल, बॅकफॉल करेगा क्या?.. महाराज साकारताना हातचं काही राखून ठेवलं जातच नाही त्यामुळे माझा होकार स्वाभाविक होता. दैनंदिन मालिकांमध्ये एक्शन सिक्वेन्ससाठी बजेट, वेळ, टेलिकास्ट priority, लोकेशन अशी अनेक बंधनं असतानाही हा शिवकाळातील सर्जिकल स्ट्राईक दिमाखदार करण्याचा "जगदंब क्रिएशन्स" ने चंग बांधला.. "सोनी मराठी" ने साथ दिली..आणि तलवारींचा खणखणाट झाला...मग वेळ आली बॅकफॉल ची.. सुरक्षेची व्यवस्था केली होती परंतु अपघात सांगून होत नाही म्हणून प्रत्येक जण सावध होता.


 


"उडी मारायची त्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो.. पाठीमागे वळून एकदा खाली पाहिलं, क्षणभर मनात विचार आला, काही सेकंद दिसणारा शॉट पाहताना खूप सोपा सहज वाटतो पण करताना आजवर पाहिलेल्या सगळ्या स्टंटमधील स्टंटमन विषयी आदर वाटल्याशिवाय राहत नाही.. मी तयार झालो..पाठीच्या दिशेने स्वतःला झोकून द्यायचं होतं, हातात असलेली तलवार सांभाळायची होती, तिने हवेत वारही करायचा होता, कॅमेरा अँगल लक्षात ठेवायचा होता...आणि आपण जमिनीवर पोहोचलो हे आदळल्याशिवाय कळणार नव्हतं. डोळे मिटून एकदा महाराजांचं स्मरण केलं आणि एक्शन सरशी झोकून दिलं स्वतःला ! भानावर आलो ते टाळ्यांच्या कडकडाटाने.... थोडा मार लागलाय, अंग अजून ठणकतंय पण शिवकाळातील "सर्जिकल स्ट्राईक" चित्रीकरणात फत्ते झाल्याचं समाधानही आहे."


या बॅक फॉल स्टंटवेळी अमोल यांना थोडा मार देखील लागलाये. मात्र सर्जिकल स्ट्राईकचं चित्रीकरण फत्ते झाल्याचं त्यांना समाधान असल्याचही म्हटलंय.