मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने अनेकांच्या मनात ठसा उमटवणारे व्हिलन अमरीश पुरी यांचा नातू चक्क मराठीत चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण करत आहे. मात्र तो अभिनय नाही तर चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अंजनेय साठे असं त्याचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजनेय हा अमरीश पुरी यांच्या मुलीचा मुलगा. आजोबांचा अभिनयाचा वारसा सोडला तर त्याच्या कुटुंबात सगळे डॉक्टर आहेत. अंजनेय यापूर्वी अनेक म्युझिकल कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आता तो  'जिंदगी विराट' नावाच्या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. याबद्दल बोलताना अंजनेय म्हणतो, "चित्रपटाची निर्मिती करताना एक गोष्ट माझ्यासमोर स्पष्ट आहे, ती म्हणजे चित्रपट संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघण्यासारखा हवा. म्हणूनच हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनपट आहे."


 वडील-मुलाच्या नात्यावर आधारलेली या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात किशोर कदम, भाऊ कदम, अतुल परचुरे, उषा नाईक यांसारखे दमदार कलाकार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन सुमीत संघमित्र याने केले असून सुरज-धीरज यांनी चित्रपटाला संगीत दिलंय. सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली यांसारख्या दिग्गज गायकांनी चित्रपटात गाणी गायली आहेत. २९ सप्टेंबर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.