मुंबई : आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव 'गणराज गजानन' असे असून गणेशाला वंदन करणाऱ्या या आल्हाददायी गाण्याला राहुल देशपांडे यांचा सुमधुर आवाज आणि संगीत लाभले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर या गायला समीर सावंत यांनी शब्दबद्ध केले आहे. अमृता खानविलकरच्या बहारदार नृत्याने या गाण्यात अधिकच रंगत आणलीये. आशिष पाटील यांचे  नृत्यदिग्दर्शन, संजय मेमाणे यांचे छायाचित्रण लाभलेल्या या गाण्याचे आयोजन सारंग कुलकर्णी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने 'गणराज गजानन' या अल्बमबद्दल सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर सर्वांनाच या गाण्याविषयी उत्सुकता लागली होती. अखेर हे मन प्रफुल्लित करणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आता अधिकच भक्तिमय होणार!


आपल्या या नवीन गाण्याविषयी अमृता खानविलकर म्हणते,  ''बाप्पाच्या गाण्याच्या निमित्ताने मी माझे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. बाप्पाची मूर्ती ज्या प्रमाणे हळूहळू आकार घेते, तशीच अतिशय श्रद्धेने ही कलाकृती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचांद लागले आहेत. मन तल्लीन करणारे हे गाणे असून 'गणराज गजानन'सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने अतिशय मन लावून या गाण्याची अर्थात 'गणरायाची' सेवा केली आहे. माझ्या पहिल्याच प्रयत्नाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल मी सगळ्यांचीच खूप कृतज्ञ आहे.''


अभिनेत्री अमृता खानविलकर अनेकदा नव-नविन उपक्रम करत असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेले काही दिवस ती या उपक्रमाचं प्रमोशन करत होती. अखेर अमृत कला नावाने तिने आपल्या नृत्याचा नवा व्हिडिओ शेअर केलाय. .कोरिओग्राफर आशिष पटीलने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या दिलखेचक अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची कायमच मनं जिंकून घेते. अमृता ही उत्तम डान्सर आहे सोबतच ती उत्तम अभिनेत्रीही आहे.