मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी'  ह्या सिनेमात दिसणार आहे.  'राझी' चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा ह्या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे. पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला ह्या फिल्ममध्ये उर्दूमध्ये संवाद होते. आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आता 'राझी'मध्ये मुस्लिम भूमिकेत ती दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे,‘कट्यार...’नंतर हा सिनेमा करताना पुन्हा एकदा अमृताने उर्दूच्या शिकवण्या घेतल्या. अमृता ह्याविषयी म्हणते, 'कट्यारपेक्षाही ह्या सिनेमात जास्त कठीण उर्दू होतं. त्यात मी मशहूर गीतकार-शायर गुलजार ह्यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, मी सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघना मॅमनी माझ्या तयारीचं कौतुक केलं''


'राझी' सिनेमातील एक दृश्य 

ती पुढे म्हणते, 'मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच तर ऑडिशन झाल्या-झाल्या मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केले. सिनेमाचे शुटिंग सुरू झाल्यावर काही सीन्समध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघना मॅमने माझी पाठ थोपटली... आणि ह्याचा अर्थातच मला अभिमान वाटतो'