`सुपर ३०`चा ट्रेलर पाहून आनंद कुमार यांना अश्रू अनावर
आनंद कुमार यांच्याच आयुष्यावर चित्रपटाचं कथानक आहे.
मुंबई : पटनातील बहुचर्चित शिक्षण संस्था 'सुपर ३०'चे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'सुपर ३०'चा ट्रेलर ४ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. विकास बहल दिग्दर्शित 'सुपर ३०' येत्या १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आनंद कुमार यांनी संपूर्ण कुटुंबियांसोबत पाहिला. आपल्या संपूर्ण जीवनातील कठिण प्रसंगाचा प्रवास चित्रपटाच्या रुपात पाहताना आनंद यांच्या संपूर्ण कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.
आनंद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवरुन चित्रपटाचा ट्रेलर पाहतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब ट्रेलर पाहताना दिसत आहे. आनंद यांनी या फोटोसह एक भावनिक कॅप्शनही लिहिलं आहे. आनंद यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर हृतिकने ट्विटरवर शेअर केला आहे.
चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्याआधी चित्रपट सतत चर्चेत होता. गेल्या वर्षी ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी 'सुपर ३०'चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरनंतर चित्रपट गूगलच्या टॉप ट्रेड्समध्ये सामिल झाला होता. त्यानंतर गूगलनेही या चित्रपटाची दखल घेत 'सुपर ३०' वर एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता. त्या दरम्यान हृतिक रोशनही गूगलवर टॉप सर्चमध्ये आला होता.
चित्रपटाचा ट्रेलर पाहता हृतिक रोशनने चित्रपटासाठी केलेली दोन वर्षांची मेहनत बॉक्स ऑफिसवर त्याला चांगलं यश मिळवून देऊ शकते असं म्हणण्यास हरकत नाही.