बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात अनिल कपूर आणि सनी देओल दोघेही नवे सुपरस्टार म्हणून उदयास येत होते. एकीकडे सनी देओल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अॅक्शन हिरो म्हणून समोर येत असताना, सडपातळ बांधा असणारा अनिल कपूर वैविध्यपूर्ण भूमिका स्विकारत होता. अनिल कपूर आणि सनी देओल यांनी 'जोशीले' 'इंतकाम' आणि 'राम अवतार' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. 80 च्या दशकाच्या अखेरीस हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण असं म्हटलं जातं की, जोशीले चित्रपटाच्या मुहूर्तालाच सनी आणि अनिल यांच्यातील शीतयुद्ध सुरु झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, मुहूर्त सीनच्या वेळी सर्व प्रमुख अभिनेत्यांना आपल्या डायलॉगसह चित्रपटाचं नावही बोलायचं होतं. सनी देओलने दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे आपला डायलॉग म्हटला आणि बाजूला झाला. पण अनिल कपूरने आपली वेळ आल्यानंतर त्याच्यात आपले काही डायलॉग जोडले. त्यावेळी मुहूर्ताला धर्मेंद्रही उपस्थित होते. त्यांना ही बाब आवडली नव्हती. 


पण दुसरीकडे चित्रपटाचं शुटिंगही अद्याप पूर्ण झालं नव्हतं आणि पुन्हा एकदा वाद झाला. जोशीले चित्रपटाच्या पोस्टरवर अनिल कपूरचं नाव सनी देओलच्या वर असल्याने धर्मेंद्र संतापले होते. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर क्रेडिटमध्ये अनिल कपूरचं नाव सनी देओलच्या आधी दाखवण्यात आलं. सनी देओलसह धर्मेंद्र यांनाही  हे रुचलं नव्हतं. सनी अनिलपेक्षा जास्त प्रसिद्ध असून तो मोठा अभिनेता असल्याने त्याचं नाव पहिलं यायला हवं होतं असं धर्मेंद्र यांचं म्हणणं होतं. दुसरीकडे अनिल कपूरच्या बाजूने बोनी कपूर मैदानात होते. अनिल कपूर ज्येष्ठ असल्याने त्याचं नाव पहिलं असावं असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला होता की, दोघांनी एकत्र काम न कऱण्याचा निर्णय घेतला. पण जे चित्रपट साईन केले होते त्यांचं शूटिंग पूर्ण करावंच लागणार होतं. 


'जोशीले' चित्रपटादरम्यानचा हा वाद त्याचवेळी सुरु असणाऱ्या 'राम अवतार'च्या शुटिंगवरही पाहायला मिळाला. सनीची या चित्रपटात काम करण्याची इच्छा नव्हती. पण निर्माते सुनील हिंगोरानी यांच्य़ाशी कौटुंबिक संबंध असल्याने त्याला चित्रपट करावा लागला. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनी आणि अनिल एकमेकांशी बोलतही नव्हते असं सांगितलं जातं.  


नाराज सनी देओलचा एका सीनदरम्यान सर्व राग समोर आला. एका सीनमध्ये सनी देओलला अनिल कपूरचा गळा पकडायचा होता. पण रिपोर्ट्सनुसार, सनी देओलचा ताबा सुटला आणि त्याने जोरात अनिल कपूरचा गळा पकडला. यामुळे अनिल कपूरला श्वास घेताना त्रास होऊ लागला. डायरेक्टरने कट बोलल्यानंतर सनी गळा सोडण्यास तयार नव्हता. अखेर फार प्रयत्नानंतर दोघांना वेगळं करण्यात आलं. सेटवर सर्वांनाच हा प्रकार पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता. अनिल कपूरने अनेक मुलाखतींमध्ये आपला गळा दाबल्याचा आरोप केला होता. त्यावेळी या बातमी सनसनाटी निर्माण केली होती. 


पण अखेर 'राम अवतार' आणि 'इंतकाम' या दोन्ही चित्रपटांचं शुटिंग पूर्ण झालं. पण दोघांमधील अंतर काही कमी झालं नाही. रिपोर्टनुसार, इंतकाम चित्रपटाच्या सेटवरही दोघे भिडले होते. झालं असं की, एका सीनमध्ये अनिल कपूरला सनीच्या जवळ जाऊन ओरडायचं होतं. यादरम्यान दोघे इतक्या जवळ उभे होते की, अनिल कपूरच्या तोंडातील थुंकी सनीच्या चेहऱ्यावर उडत होती. सनीने समजावल्यानंतरही अनिल कपूर त्याचप्रकारे बोलत होता. यानंतर अखेर सनी देओलचा पारा चढला आणि त्याने थेट अनिल कपूरची कॉलरच पकडली. भांडण इतकं टोकाला गेलं होतं की, सेटवरील कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली होती. 


हा चित्रपटही अखेर कशातरी प्रकारे पूर्ण झाला. पण त्यानंतर दोघांनी एकमेकांसह कधीही काम न कऱण्याची शपथच घेतली. धर्मेद्र यांनीही सनीला अनिलसह पुन्हा काम न करण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं जातं.