Upendra Limaye on Amitabh Bachchan: सध्या अॅनिमल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवतो आहे. या चित्रपटात अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भुमिकेचेही प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. आपल्या या चित्रपटातील अनुभवाबद्दलही ते बोलते झाले आहेत. यावेळी त्यांनी आपला एक फार जुना परंतु आठवणीत राहण्यासारखा किस्सा सांगितला आहे. उपेंद्र लिमये यांनी गेली अनेक वर्षे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं मोलाचं योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची एक गोड आठवण सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा त्यांनी उलगडा केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या 2008 साली आलेल्या 'सरकार राज' या चित्रपटाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट तेव्हा भरपूर गाजला होता. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन या चित्रपटात होते. उपेंद्र लिमये यांनी देखील या चित्रपटातून कांतीलाल वोरा या खलनायकाची भुमिका केली होती. या चित्रपटाबद्दल सांगताना ते म्हणाले की, '''सरकार राज' या चित्रपटात खलनायकाच्या भुमिकेसाठी अगोदर एका अभिनेत्याला कास्ट करण्यात आलं होतं. परंतु सेटवर बच्चनसाहेब समोर आल्यावर त्याला काम करता येत नव्हतं. तो बंद पडला. त्यामुळे त्या दिवशीचं संपूर्ण शुटिंग हे कोलमडून पडलं. अमिताभ बच्चन ज्या चित्रपटात आहेत, त्या चित्रपटाचं एका दिवसाचं शुटिंग बंद होणं म्हणजे केवढं नुकसान झालं असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.''


पुढे ते म्हणाले, ''रामूने (राम गोपाल वर्मा) या घटनेनंतर अमिताभ यांना वचन दिलं की मी लवकरात लवकर दुसऱ्या अभिनेत्याला या भुमिकेसाठी उभं करेन. त्यांचं हे बोलणं झाल्यानंतर रामूनं मला लगेचच फोन केला. त्यानं मला सगळी परिस्थिती आधी समजावून सांगितली. तुझ्या वयाची भुमिका नव्हती त्यामुळे आधी तुला यासाठी विचारलं नाही, असंही तो म्हणाला. बोलणं झाल्यानंतर मी सेटवर गेलो. सगळं व्यवस्थित पार पडलं.'' 


हेही वाचा : 'फेस वॉश करायला विसरली?', वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल


त्यापुढे ते म्हणाले, ''पुढे काही दिवसांत रामूनं बच्चन साहेब, अभिषेक आणि ऐश्वर्यासाठी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ठेवलं होतं. त्या स्क्रिनिंगला रामूनं मला सुद्धा बोलावलं होतं. तो चित्रपट संपुर्ण पाहिल्यानंतर बच्चन साहेबांनी मला मिठी मारली आणि ते म्हणाले , 'तू खरंच खूप अप्रतिम अभिनय केला आहेस. तुला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!' त्यांची एक मिठी त्यावेळी मला राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यासमान वाटली होती. प्रेमानं असं जवळ घेऊन एवढ्या मोठ्या अभिनेत्यानं तुमचं कौतुक केलं की मनात एक वेगळीच उर्जा व उत्साह तुमच्यात निर्माण होतो'', असा अनुभव त्यांनी सांगितला. हा Larger Than Life अनुभव ऐकून आपल्यालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.