रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाला मिळालेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरुनच पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळेल असं दिसत होतं. पण हा चित्रपट बॉलिवूडसाठी या वर्षातील सर्वात मोठी दुसरी ओपनिंग मिळवून देईल याचा कोणीही विचार केला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या दिवशी 63 कोटींची कमई करणाऱ्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने बॉलिवूडला या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची ओपनिंग दिली आहे. या चित्रपटाने रणबीर कपूरच्या नावावर सुपरस्टारचा शिक्का मारला असून, त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेले आकडे बॉक्स ऑफिसला आणखी एक सुपरहिट मिळणार असल्याचं स्पष्ट करत आहेत. 


'अ‍ॅनिमल'ने दुसऱ्या दिवशी घेतली मोठी झेप


ट्रेड रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल'ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेतली आहे. चित्रपट समीक्षकांनी संमिश्र रिव्ह्यू दिले आहेत. पण प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादाचा परिणाम तिकीट खिडकीवर दिसून येत आहे. यामुळे पहिल्या दिवसाच्या तुलनेत अॅडव्हान्स बुकिंग कमी असतानाही चित्रपटाने दुसऱ्या दिवशी मोठी कमाई केली. शनिवारी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने जवळपास 66 कोटींच्या आसपास कमाई केली. 


पठाणला टाकलं मागे


शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या नावे पहिल्या शनिवारी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाने पहिल्या शनिवारी 77 कोटींहून अधिक कमावले होते. यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर 'अ‍ॅनिमल' चित्रपट आला आहे. चित्रपटाने 53.25 कोटींची कमाई करणाऱ्या 'पठाण'ला मागे टाकलं आहे. 


'अ‍ॅनिमल' चित्रपटाने फक्त 2 दिवसात 130 कोटींची कमाई केली आहे. याआधी पठाण, जवान, टायगर 3 आणि केजीएफ 2 ने फक्त दोन दिवसांत 100 कोटींची कमाई करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 2 दिवसांत 100 कोटी कमावणारा 'अ‍ॅनिमल' हा पाचवा चित्रपट ठरला आहे. पण दोन दिवसांच्या एकूण आकडेवारीत 'अ‍ॅनिमल'ने जवान, पठाण आणि गदर 2 चित्रपटांना पिछाडलं आहे. 


'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डीने केलं आहे, कबीर सिंगनंतर हा त्याचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूरचा अॅक्शन अवतार आणि बॉबी देओलची नकारात्मक भूमिका यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. हा चित्रपट लांबीत मोठा असून, सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अनिल कपूरने बापाची तर रणबीर कपूरने मुलाची भूमिका निभावली आहे. रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल प्रमुख व्हिलन आहे, ज्याच्या मागावर रणबीर कपूर आहे.