Animal Upendra Limaye: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, बॉबी देओल यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहेत. यावेळी या चित्रपटातून एका मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा आहे. छोट्याच्या सीनमध्येही या अभिनेत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे उपेंद्र लिमये. मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांतून, मालिकांतून कामं केली आहे. उपेंद्र लिमये यांना 'जोगवा' चित्रपटातील भुमिकेसाठी सर्वाेत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी त्यांनी आपल्या Animal चित्रपटातील भुमिकेविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून सगळ्यांच्याच अभिनयाचे कौतुक होताना दिसते आहे. परंतु यातही अभिनेता उपेंद्र लिमयेंच्या अभिनयानं चारचांद लावले आहेत. 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत यांनी सांगितलं की, ''दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्या असिस्टंटचा मला फोन आला होता. 'उपेंद्र सर टी सिरिजचा एक चित्रपट येतोय. त्यात एक सीन आहे. तुम्ही कराल का?', असं त्यांनी मला विचारलं होतं. 'एक सीन आहे तर मला इंटररेस्ट नाही. मी करणार नाही.', असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं, 'अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचा सिनेमा आहे.''


''अर्जुन रेड्डी हा चित्रपट मी पाहिला होता आणि तो मला प्रचंड आवडला होता. कॉलेजच्या दिवसात राम गोपाल वर्माचा पहिला सिनेमा 'शिवा' बघितल्यानंतर मी प्रचंड प्रभावित झालो होतो. दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही? असा तो सिनेमा होता. तसं मला अर्जुन रेड्डी बघितल्यावर झालं होतं. त्यामुळे मग मला थोडासा इंटरेस्ट जाणवला. एक सीन आहे म्हणून तुम्ही भूमिका नाकारल्याचं मी सांगितलं आहे पण तुम्हीच ती भूमिका करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचं मला संदीप रेड्डीच्या असिस्टंटनं सांगितलं. त्यानंतर मी संदीप रेड्डी यांना भेटायला गेलो'' असं प्रसंग त्यांनी नमूद केला. 


त्यापुढे उपेंद्र म्हणाले की, ''त्यांना भेटल्यानंतरही नकार द्यायचंच मी ठरवलं होतं. मिटिंगमध्ये त्यांनी मला हा एक हाय वोल्टेज ड्रामा असल्याचं सांगितलं. त्यांनी ज्या प्रकारे तो सीन मला सांगितला, खरंतर त्यामुळे मी या चित्रपटासाठी होकार द्यायचं ठरवलं. सीनमध्ये कुठेही व्हिएफएक्स वापरायचं नाही हेही त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी मला मशीनचा फोटोही दाखवला. एका वेगळ्या लेवलचा तो सीन करायचा हे त्यांच्या डोक्यात होतं. ते अॅक्शन सीक्वेन्स अजय-अतुल यांच्या गाण्यावर कट करणार, हे सगळंच त्यांनी ठरवलं होतं.


त्यांनी हा सीन सांगितल्यावर मी स्पेशल अपेरियन्स करायचा असं सांगितलं. 'तुला हवं ते करू, पाहिजे तर मी टायटलला तुला स्पेशल अपेरियन्स असं देतो. पण तूच कर', असंही ते मला म्हणाले. त्यांनी माझी फार कामंही बघितली नव्हती. 'सरकार राज'मधलं काम त्यांना प्रचंड आवडलं होतं.'' यावेळी असा किस्सा त्यांना सांगितला.