मुंबई : झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० भागांचा यशस्वी टप्पा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाईचे लोकप्रिय चॅनल झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या अंजली या मालिकेने यशस्वी २०० एपिसोड पूर्ण केले आहेत. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चाललेल्या एका तरुण स्त्री डॉक्टरच्या प्रवासाची कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सुरूची अडारकर साकारत असलेली डॉ. अंजली ही एक नाशिक जवळच्या एका खेड्यातून आलेली मेहनती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील लोकांची मदत करण्यासाठी मोबाइल रुग्णालय उभारण्याचे स्वप्न बाळगते आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी ती डॉ. जनार्दन खानापूरकरांच्या रुग्णालयात काम करत आहे.


डॉ. अंजली तिच्या मार्गात आलेल्या अनेक आव्हानांचा सामना निडरपणे करते. मालिकेने २०० भाग पूर्ण केल्याचा आनंद संपूर्ण टीमने केक कापून साजरा केला. पण हा केक कापण्याचा मान मुख्य कलाकारांनी मालिकेतील जुनिअर आर्टिस्ट्स जे डॉक्टर, वॉर्डबॉयज, रुग्ण, नर्सेस, आणि अशा अनेक भूमिका साकारत आहेत त्यांना दिला आणि त्यावेळी बाकीची टीम त्यांना प्रोत्साहन देत होती. मालिकेच्या निर्मात्यांचा विश्वास आहे की मोठ्या किंवा छोट्या अशा सर्वांच्या सहभागामुळेच हे अंजलीचे यश मिळाले आहे.  


२०० भागांचा टप्पा गाठल्याच्या उत्सुकतेविषयी बोलताना, डॉ. अंजलीची भूमिका साकारणाऱ्या सुरूची आडारकर, म्हणाल्या, ‘‘अंजली हे पात्र फक्त मालिका पाहणाऱ्या हजारो तरुण मुलींनाच नाही तर मला स्वतःला देखील माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. डॉ. अंजलीची भूमिका साकारण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मला खात्री आहे की प्रेक्षक आमच्या कामाची अशीच स्तुती करत राहतील आणि अंजलीला तिचे ध्येय गाठण्यासाठी मदत करतील.’’  


डॉ. यशची भूमिका साकारणारे हर्षद अतकरी म्हणाले, ‘‘मी जेव्हा प्रथम ही कथा ऐकली होती तेव्हा माझ्या लगेच लक्षात आले होते की अंजली मध्ये तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक सशक्त संदेश देण्याची संभाव्यता आहे. २०० वा टप्पा ही खरेतर नुसती सुरूवात आहे आमच्यासाठी आणि आमच्या या यशाचा मला अतिशय आनंद झालेला आहे.’’


डॉ. असिमचे पात्र रंगविणारे अभिनेता पियुष रानडे म्हणाले, ‘‘एक अभिनेता म्हणून जेव्हा तुमचा शो 200 वा टप्पा गाठतो तेव्हा खूपच छान वाटते, येणाऱ्या अनेक टप्प्यातील पहिला टप्पा. माझे सह-कलाकार आणि निर्माते माझे कुटुंब बनले आहेत आणि ते माझ्यासाठी माझी ताकद सुद्धा आहेत. प्रेक्षकांनी आमच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले आहे.’’


अंजलीच्या यशाविषयी बोलताना, झी युवा आणि झी टॉकिजचे बिझनेस प्रमुख, बवेश जानवलेकर म्हणाले, ‘‘झी युवाच्या अंजली या मालिकेमधून आम्ही तरुणांना विशेषतः मुलींना त्यांच्या स्वप्नांचा मागोवा घेण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहोत. मालिकेने गाठलेल्या २०० भागांच्या टप्प्याने आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि आम्ही २०० वरून २००० पर्यंत तो जाईल अशी आशा व्यक्त करत आहोत. आमच्या अंजली या मालिकेविषयी दाखविलेल्या प्रेम आणि अखंड पाठिंब्यासाठी आम्ही आमच्या प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला खात्री आहे की ते या मालिकेला असाच पाठिंबा देत राहतील.’’