कुरिअरमधून मागवली दुर्मिळ वस्तू, उघडून बघताच बसला धक्का...संगीतकार अमित पाध्येसोबत घडला धक्कादायक प्रकार
संगीतकार अमित पाध्ये यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार. दुर्मिळ अशा जुन्या पायपेटीची दुरावस्था.
संगीतकार, संगीत संयोजक अमित पाध्ये यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. अमित पाध्ये यांनी अंजनी कुरिअरमधून एक दुर्मिळ, ऐतिहासिक अशी पाय पेटी म्हणजे हार्मोनियम मागवले होते. पण या पायपेटीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. याबाबत विचारणा केली असता अद्याप उत्तर मिळालेले नाही.
24 मे रोजी संगीत संयोजक अमित पाध्ये यांचा मित्र संतोष जोशी याने कणकवलीहून दुर्मिळ, ऐतिहासिक अशी पायपेटी कुरिअर केली. ही पेटी 26 मे रोजी अमित पाध्ये यांच्याकडे मुंबईतील जोगेश्वरीच्या पत्त्यावर आली. पण ही पेटी जेव्हा कुरिअर केली होती तेव्हा ती सुस्थितीमध्ये होती. पण 26 मे रोजी मुंबईत पोहोचल्यावर मात्र या पेटीची अवस्था अतिशय दयनीय झाली होती.
संगीतकारासाठी त्याची पेटी किंवा त्याचे कोणतेही वाद्य अतिशय जवळचे असते. अशावेळी अमित पाध्ये यांच्या पेटीची झालेली अवस्था त्यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक आहे. या सगळ्या बाबतीत कणकवली अंजनी कुरिअरमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी मुंबई सीएसटी ऑफिसमध्ये याबाबत विचारणा करण्यास सांगितले.
अमित पाध्ये यांची पोस्ट
सीएसटी अंजनी कुरिअर येथे तुकाराम हुंडारे यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कोणताही फोन अथवा मॅसेजला उत्तर दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी ग्राहक पंचायत मध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला पण कोणतीही मदत मात्र केलेली नाही. हा सगळा प्रकार एक संगीतकार म्हणून आणि सामान्य नागरिक म्हणून संतापजनक असल्याचं अमित पाध्ये सांगतात.
कुरिअर सेवा ही सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असते. आपण यामोबदल्यात पैसे ही देतो आणि विश्वासाने त्या कुरिअर सेवेची सेवा घेतो. पण अशा पद्धतीने मिळालेली उत्तरे आणि अंजनी कुरिअरकडून मिळालेली वागणूक ही संतापजनक असल्याचं अमित पाध्ये सांगतात.
अमित पाध्ये यांची ओळख
अमित पाध्ये हे संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींसोबत काम केलं आहे. अमित पाध्ये यांनी उबुंटू, कट्यार काळजात घुसली, मी वसंतराव देशपांडे, शिवाजी पार्क, डॉ काशिनाथ घाणेकर आणि आत्ताच येणार रघुवीर या सिनेमांमध्ये संगीत संयोजक म्हणून काम केले आहेत. तसेच बंदिश bandits या वेबसिरीजमध्येही संगीत संयोजकाचे काम केले आहे.