`सेटवर मिळते खास ट्रीटमेंट....`, ऑनस्क्रीन मुलीच्या आरोपांवर रुपाली गांगुलीचं थेट उत्तर
`अनुपमा` या लोकप्रिय मालिकेतील `राही`ची भूमिका साकारलेली अलिशा परवीन ही मालिकेतून बाहेर पडली. यावरील चर्चेत तिने रुपाली गांगुलीवर आरोप केले आहेत. पाहा, रुपाली गांगुलीचं मुलाखतीतील उत्तर.
Rupali Ganguly On Alisha Parveen Allegations: 'अनुपमा' या हिंदी मालिकेने चाहत्यांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. विशेषत: या मालिकेतील 'अनुपमा' ही भूमिका साकारत असलेली रुपाली गांगुली तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. यामुळेच ती टी.व्ही मालिकांमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. मालिकांतील कलाकारांमुळेच 'अनुपमा' ही टीआरपी (TRP) मध्ये सर्वात पुढे असणारी मालिका आहे.
परंतु, या मालिकेतील बरेच कलाकार बाहेर पडल्यामुळे ही मालिका सध्या वादविवादांचा सामना करत असल्याचं समोर येत आहे. यामध्ये अलीशा परवीन या अभिनेत्रीचे नाव समोर आलं आहे. अलीशाने या मालिकेत 'राही' म्हणजेच रुपालीच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली आहे.
अलीशा परवीन या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगत असल्याची दिसत आहे. या बातमीमुळे मालिकेचे चाहते थक्क झाले आहेत. मालिकेतून बाहेर पडण्याच्या चर्चेत अलीशाने मालिकेच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. यासंबंधी बोलताना तिने सांगितले की, "मला या शो मधुन काढुन टाकण्यासंबंधी काहीच पूर्वकल्पना दिली गेली नव्हती." ही बातमी समोर आल्यानंतर रुपाली गांगुलीचा यात हात आहे असे अंदाज बांधले जाऊ लागले. रूपाली अलिशाला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे इनसिक्योर होत असल्याचा आरोप अलीशाने केला. या आरोपामुळे हा वाद शिगेला पोहोचला.
रुपाली गांगुलीचे उत्तर
रुपाली गांगुलीने न्यूज पोर्टल वरील एका मुलाखतीत हे सर्व आरोप अमान्य असल्याचे सांगितले. मालिकेसंबंधी सगळे निर्णय हे राजन शाही आणि स्टार प्लस घेत असल्याचं तिने म्हटलं. "मी वर्षानुवर्षे या मालिकेत काम करते आणि कधीच स्वत: साठी कोणतेच सीन एडीट करण्याची मागणी केली नाही."असंही ती म्हणाली. पुढे तिने आपल्या कपड्यांची सुद्धा निवड करत नसल्याचं सांगितलं. यावरुन एखाद्याला मालिकेतून काढून टाकण्यावर ती निर्णय घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालं. ती म्हणाली, "मी नेहमी माझं काम प्रोफेशनल पद्धतीने करते."
हे ही वाचा: 91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
काय म्हणाली अलीशा परवीन?
इंडिया फोरम्स मधील मुलाखतीत ती म्हणाली, "मी माझं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आणि मला मालिकेतून काढून टाकण्यामागे कोणाचा हात आहे, हे मला माहित नाही परंतु रुपालींचं सेटवरील बाकीच्या लोकांसोबत सुद्धा काहीसे वाद होत होते." मालिकेतून काढून टाकण्याबाबत काहीच माहिती नसल्यामुळे यासंबंधी तिच्याकडे काही उत्तर नसल्याचं तिने सांगितलं. तिच्या आणि रुपालीच्या सेटवरील नात्याला प्रोफेशनल असल्याचं आणि सेटवरील अलीशाची वर्तणूक चांगली असल्याचं तिने सांगितलं.