मुंबई : एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाला अनेक स्तरांतून पसंती मिळत असताना गडकरी यांच्या नावाला पसंती देणाऱ्यांमध्ये बी- टाऊनमधील एका कलाकाराचं नावही जोडलं गेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्याने याविषयी आपलं मत मांडलं. तो सेलिब्रिटी चेहरा म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यपचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपमध्ये सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी यांच्या नावासाठी कोणी पर्याय असेल, तर ते म्हणजे नितीन गडकरी. भ्रष्टाचार हा सर्वच पक्षांमध्ये होत असतो. पण, आता मात्र या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. कारण, सध्या भ्रष्टाचार हा अनेकांसाठी आदर्श झाला आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालूच शकत नाही. राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी तुम्ही सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट करु शकता”, असं अनुराग ट्विटद्वारे म्हणाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीच पर्याय नाही, अशा आशयाच्या एका ट्विटला उत्तर देत त्याने आपलं मत स्पष्टपणे मांडल्याचं पाहायला मिळालं. 



सत्ताधारी भाजपच्या 'मै भी चौकीदार' या प्रचारमोहिमेवर टीका करत या देशाला एका पंतप्रधानांची गरज आहे सुरक्षा रक्षकाची नव्हे असं अनुरागने स्पष्ट केलं. मोदींच्या भूमिकांना अनुरागने विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. सध्याच्या घडीला हिंदी कलाविश्वातून जवळपास सहाशे कलाकारांनी भाजप आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांना मत न देण्याचं आवाहन मतदारांना केलं. भारतीय संविधानाला धोका असल्याचं म्हणत त्यांनी ही भूमिका मांडली. 


एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपविरोधात या कलाकारांनी आवाज उठवलेला असतानाच दुसरीकडे जवळपास ९०० कलाकारांनी भाजपला मत देण्याचं आवाहन मतदारांना करत एक पत्रक जारी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कलाविश्वातही आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत असंच म्हणावं लागेल.