जामिया विद्यापीठातील `त्या` व्हिडिओवर अनुराग कश्यपचा संताप
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधात दिल्लीत हिंसात्मक आंदोलनं सुरूच आहेत.
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधात दिल्लीत हिंसात्मक आंदोलनं सुरूच आहेत. याच दरम्यान दिल्लीत जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांना विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जामिया विद्यापीठातील वाचनायाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा जामिया कॉर्डिनेशन समितीनं (Jamia Coordination committee) केला आहे. परंतु, या व्हिडिओवर अद्याप कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा झालेला नाही.
शिवाय, बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये ' हा भयानक व्हिडिओ जामिया मिलीयाद्वारे १५ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस वाचनालयातील मुलांवर लाठीमार करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप कसे कार्य करते याचा स्पष्ट पुरावा आहे.' असं लिहलं आहे.
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला आणि त्यांना दिलेली वागणूक पाहता हे सारंकाही निराशाजनक असल्याचं म्हणत दिग्दर्शक अनुराग कश्यपने संताप व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप याने केलेली सोशल मीडिया पोस्ट या साऱ्यामध्ये बरंच काही सांगून गेली. अनुरागच्या या पोस्टमध्ये त्याने कोणतंही कॅप्शन लिहिलेलं नाही. पण, पोस्ट केलेला फोटोच सारंकाही सांगून जात आहे. देशात भाजप सरकारचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे घडणाऱ्या घटना याकडे झुकणारा फोटो त्याने पोस्ट केला.
सर्वच स्तरातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचे राजकीय पटलावर होणरे सर्व परिणाम नेमके काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होतील. तूर्तास देशात उसळलेला आगडोंब थांबलाच पाहिजे ही मागणी आता प्रकर्षाने मांडण्यात येत आहे.