AR Rahman on Pune Concert: पुणे पोलिसांनी (Pune Police) काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार ए आर रहमान (AR Rahman) यांचं कॉन्सर्ट रोखलं होतं. 10 वाजल्यानंतरही कॉन्सर्ट सुरु असल्याने पोलिसांनी मंचावर जाऊन हा कार्यक्रम बंद पाडला होता. पोलिसांनी कॉन्सर्ट बंद पाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर ट्विटरला (Twitter) अनेकांनी यावर आपली मतं व्यक्त केली होती. काहींनी ए आर रहमानची बाजू घेतली होती, तर काहींनी सर्वांसाठी कायदा समान असल्याचं सांगत पोलिसांचं कौतुक केलं होतं. दरम्यान या घटनेनंतर ए आर रहमानने प्रथमच पुण्यातील कॉन्सर्टवर भाष्य केलं आहे. पुण्यात सादरीकरण करणं आपल्यासाठी 'रॉकस्टार क्षण' होता असं रहमानने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री ए आर रहमानने ट्विट केलं असून, आपण आणि आपला बँड प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे भारावलो आहोत, तसंच तुम्हाला अजून अनुभव देण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या सर्वांसाठी रॉकस्टर क्षण होता का? मला वाटतं हो नक्कीच! प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आम्ही भारावलो असून, अजून देण्याची इच्छा आहे. धन्यवाद पुणे...एका संस्मरणीय संध्याकाळसाठी," असं ए आर रहमानने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 



ए आर रहमानने यावेळी पुण्यातील राजा बहादूर मिल्समध्ये रविवारी पार पडलेल्या लाईव्ह कॉन्सर्टचा व्हिडीओही शेअर केला आहे. आपल्या रोलर कोस्टर राईडचा एक छोटासा भाग तुमच्यासाठी असं त्याने हा व्हिडीओ शेअऱ करताना म्हटलं आहे. 


दरम्यान मंगळवारी ट्विटरला #DisRespectOfARRahman हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेकांनी ए आर रहमानला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं सांगत कारवाईचा निषेध केला होता. काहींनी महाराष्ट्र सरकारवर टीका करत तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हटलं होतं. 


एका चाहत्याने म्हटलं आहे की "ए आर रहमानसोबत त्यांनी जे काही केलं, ते योग्य नाही. गाणं सुरु असतानाच थांबवणं हा अपमान आहे. तरीही ए आर रहमानने अपमान केला नाही".


रविवारी हे कॉन्सर्ट पार पडलं होतं. व्हायरल व्हिडीओत पोलीस अधिकारी मंचावर जाऊन ए आर रहमान आणि इतर कलाकारांना 10 वाजून गेले असल्याने कार्यक्रम तात्काळ थांबवण्यास सांगताना दिसत आहेत. दरम्यान ए आर रहमानने आधीच्या पोस्टमध्ये पुण्याचे आभार मानले होते. "पुणे, तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार. पुणे हे सांस्कृतिक संगीताचं घर का आहे हे दिसलं असून, त्याच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आम्ही लवकरच पुन्हा परत येऊ," असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.


ए आर रहमनाच्या एका सहकाऱ्याने पोलिसांनी थेट मंचावर येऊन रहमानकडे बोट दाखवण्याऐवजी आयोजकांशी चर्चा करायला हवी होती असं म्हटलं आहे. "10 वाजता वेळ संपत होती. पण त्यांनी हे शेवटचे गाणं असून फक्त एक मिनिट बाकी आहे असं सांगितलं होतं. पोलीस अधिकाऱ्याने स्टेजवर जाऊन रहमानला थांबायला सांगितले आणि त्याच्याकडे बोट दाखवले. पोलिसांनी आयोजकांशी बोलायला हवे होते," असं तो म्हणाला आहे.