मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडसह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही अनेकांना विश्वास होत नाहीये की अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवर सुशांतला श्रद्धांजली वाहिली. अजूनही अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे यावर व्यक्त होत आहे. अनेकांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी आणि त्याचा स्वभाव याबद्दल शेअर केलं. अभिनेता अर्जुन कपूरने देखील सुशांतसोबत केलेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरने सुशांत सिंह राजपूत सोबत जे चॅट केले ते १८ महिन्याआधीचे आहे. केदारनाथ चित्रपटाच्या रिलीजच्या एका आठवड्यानंतर सुशांतने आपल्या आई विषयी पोस्ट केली होती. त्यावेळी तो त्याच्या आईला मिस करत होता. अर्जुनने म्हटलं की, मी तेव्हा त्याला खूप जवळून ओळखत नव्हतो. पण यशराज फिल्म्स, इवेंट्स स्क्रिनिंग दरम्यान तो मला भेटला होता. सुशांतने ज्या भावनेतून हे पाऊल उचलले ते मी समजू शकतो. कारण मी देखील त्या वेदना सहन केल्या आहेत ज्या सुशांतने आपल्या आईला गमावल्याबद्दल आणि त्याच्या एकांतवासात अनुभवल्या आहेत.



अर्जुनने म्हटलं की, मला आशा आहे की माझा मित्र एका उत्कृष्ठ आणि आनंदी जगामध्ये आहे. त्याला त्या ठिकाणी शांती मिळत असेल. आम्ही सर्व आश्चर्यचकित आणि दु:खी आहोत आणि हाच विचार करतोय की, हे काय झाले आहे.'