पुणे : गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, अशा अनेक शूरवीरांच्या यशोगाथा जतन केल्या आहेत. अशीच एक यशोगाथा 'पानिपत' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका अतीव महत्त्वाच्या प्रसंगावर या चित्रपटाच्या निमित्ताने आशुतोष गोवारिकर यांनी प्रकाशझोत टाकला. ज्याला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अशा या चित्रपटाचा आणि दिग्दर्शक गोवारिकर यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोष गोवारिकर यांचा चित्रपट दिग्दर्शनाचा हा प्रयन्त पाहता संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या इच्छेप्रती त्यांचा सत्कार करण्यात आला. आशुतोष गोवारिकर यांना हिंदवी स्वराज महासंघाकडून सन्मानित करण्यात आलं. 


चित्रपटाला मिळालेलं प्रेम आणि झालेला सत्कार पाहता गोवारिकर यांनीही याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. "सत्कार नेहमी होतात कधी ते अवॉर्ड स्वरुपात असतात कधी अन्य स्वरुपाने होत असतात, पण जेव्हा सत्कार तुमच्या मातीतून तुमच्या लोकांकडून, त्यातही अतिशय पवित्र भावनेतून करण्यात येतो तेव्हा ते व्यक्त करण्यास शब्द नसतात. या देशाने आणि महाराष्ट्राने जे प्रेम 'पानिपत'ला आणि आम्हाला दिलं ते खूप खास आहे'', असं ते म्हणाले. 



आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'पानिपत' या चित्रपटातून अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले होते. त्याशिवाय इतरही अनेक कलाकारांनी या चित्रपटातून काही ऐतिहासिक भूमिका साकारल्या होत्या.