दुबईवरही किंग खानचे राज्य; बुर्ज खलिफावर शाहरूखच्या नावाची रोषणाई
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही चाहते शाहरूखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होते.
दुबई: बॉलीवूडचा किंग खान शाहरूख याने शनिवारी आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शाहरूख खानची लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून परदेशातही त्याचे अनेक निस्सीम चाहते असल्याचे दिसून आले. या सगळ्यांनी सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारे शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे तर श्रीमंतीचे प्रतिक मानले जाणाऱ्या दुबई शहरातही शाहरुखची जादू दिसून आली. येथील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफावर शाहरुखाच्या वाढदिवसानिमित्त विशेष रोषणाई करण्यात आली होती. लेझर्सच्या साहाय्याने बुर्ज खलिफावर 'हॅपी बर्थडे टू द किंग ऑफ बॉलीवूड' अशी अक्षरे झळकली. हा लेझर शो डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
नायजेरियन चाहत्यांकडून शाहरूखला शुभेच्छा
शाहरूख खान याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर याचा व्हीडिओ शेअर केला आहे. याबद्दल शाहरुखने दुबईकरांचे आभार मानले आहेत.
शाहरूख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणे मुंबईतील 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी केली होती. आदल्या रात्री मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही हे चाहते शाहरूखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होते. शाहरूखने बंगल्याबाहेर येत नेहमीप्रमाणे हात उंचावून चाहत्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. यावेळी अतिउत्साही गर्दीला आवर घालताना पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.