`तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..`; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, `नशीब समजा..`
Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.
Assembly Elections 2023 Director Slams Congress: तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी लागले. तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. मात्र तेलंगणमध्ये रेवंथ रेड्डींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. मात्र आता या विजयावरुन प्रसिद्ध दिग्दर्शकाने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा राहुल गांधींना सुनावलं आहे. तेलंगणमधील विजय हा काँग्रेसचा नसून रेवंथ रेड्डींचा असल्याचं या दिग्दर्शकाने म्हटलं आहे.
पुढील मुख्यमंत्री...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी निकालाच्या दिवशी अनेक पोस्ट करत तेलंगणमधील सत्ताबदलाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. "हाय राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी, मागील अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच मला काँग्रेसबद्दल फार आदर वाटत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे रेवंथ रेड्डी हे तेलंगणचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत," असं पहिलं ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केलं.
हा विजय काँग्रेसचा नाही
त्यानंतर पुढील निकाल लागल्यावर काँग्रेसचा राजस्थान आणि मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही पराभव झाल्याचं स्पष्ट झाल्यावर राम गोपाल वर्मा यांनी दुसरी पोस्ट केली. "काँग्रेसचा इतर सर्व राज्यांमध्ये पराभव झाला आहे. तेलंगणमधील विजय हा रेवंथ रेड्डींचा विजय आहे, काँग्रेसचा नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी नशीब मानलं पाहिजे की त्यांना रेवंथ रेड्डीच्या रुपात एक बाहुलबली मिळाला," असं राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत.
अभिमान वाटतो त्यांना मी ओळखतो
आपल्या पुढल्या पोस्टमध्ये रेवंथ रेड्डींबरोबरचा स्वत:चा फोटो शेअर करत राम गोपाल वर्मा यांनी, "मला फार अभिमान वाटतोय की सध्याचे तेलंगणचे विद्यमान मुख्यमंत्री योद्धे रेवंथ रेड्डींना मी ओळखतो. मी रेवंथ रेड्डींसमोर नतमस्तक होतो," असं म्हटलं आहे.
पोस्टचे स्क्रीनशॉट
अन्य एका पोस्टमध्ये राम गोपाल वर्मांनी आपण 26 जून 2021 रोजीच्या स्वत:च्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. यामध्ये राम गोपाल वर्मांनी काँग्रेसने रेवंथ रेड्डींना प्रदेशाध्यक्ष करुन उत्तम निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं.
रेवंथ रेड्डींचा रंकज प्रवास
रेवंथ रेड्डींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजकारणाला सुरुवात केली. टीडीएसमधून सक्रीय राजकारणामध्ये आलेल्या रेवंथ रेड्डींनी 2018 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 9 हजार मतांनी पराभूत झाले. 2019 ला लोकसभेमध्ये ते चौरंगी लढतीमध्ये 10 हजार मतांनी जिंकून आले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आलं.