प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन
अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.
नवी दिल्ली: प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन झालंय. ओमानची राजधानी मस्कतमध्ये त्यानं वयाच्या 28 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नाही. डीजे अविची याचं खरं नाव टीम बर्लिंग असं होतं. अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.
वेक मी अप, द डेज, यी मेक मी ही गाणी लोकप्रिय
अविची डीजे सोबतच निर्माताही होता. दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक पुरस्कार त्याने पटकावले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या एका अल्बमला बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. वेक मी अप, द डेज, यी मेक मी ही त्याची गाणी लोकप्रिय ठरली होती. 2013 मध्ये वेक मी अप गाण्यानं ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातला होता. हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.
अति मद्यपान केल्यानं अविचीला पोटासंबंधी आजार
अति मद्यपान केल्यानं अविचीला पोटासंबंधी आजार झाले होते. 2014 मध्ये अविचीवर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर अविचीनं प्रवास करणं कमी केलं आणि स्टुडिओमध्ये बसून काम करण्यास प्राधान्य दिलं.