जे बॉलिवूडच्या खानला जमलं नाही ते आयुष्मान करणार
2019 हे वर्ष आयुष्मानसाठी खास
मुंबई : आयुष्मान खुराना येत्या काही दिवसांत अतरंगी कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे. स्पर्म डोनर, समलैंगिक प्रेम, न्यायासाठी लढणारा अधिकारी, टक्कलमुळे हैराण असलेला तरूण यासारखे अनेक वेगवेगळे विषय आयुष्मानने साकारले आहेत. त्याचे हे सगळे प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत. आता आयुष्मान खुराना असं कॅरेक्टर करणार आहे जे हिंदी सिनेमातील सुवर्ण काळात यशस्वी ठरले आहे.
हिंदी सिनेमात गुप्तहेरांवर आधारित सिनेमांची परंपरा आहे. देव आनंद यांच्या 'सीआयडी', 'ज्वेलथीफ' आणि 'जॉनी तेरा नाम', तर जितेंद्र यांच्या 'फर्ज' आणि धर्मेंद्र यांच्या 'आंखे जैसी जासूसी' सिनेमात उत्तम कॅरेक्टर साकारली आहेत. त्यानंतर शाहरूख खानचा 'बादशाह' आणि सैफ अली खानचा 'एजंट विनोद' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये सुपरफ्लॉप ठरला. (Year Ender 2019 : यंदाच वर्ष आयुष्मान खुरानासाठी खास)
हिंदी सिनेसृष्टीत नवीन विषय घेऊन आयुष्मान खुराना कायमच प्रयत्नशील असतो. आता गुप्तहेराच्या भूमिकेत आयुष्मान दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत असून या सिनेमाची घोषणा कधीही होऊ शकते. आयुष्मान आणि अनुभव सिन्हाने या अगोदर 'आर्टिकल 15' सिनेमात काम केलं आहे. या सिनेमाला समीक्षकांकडून समिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. 'आर्टिकल 15' करता अनुभवने दुसऱ्याच कलाकाराचा विचार केला होता. मात्र आयुष्मानला सिनेमाची कथा आवडल्यामुळे त्याने या सिनेमाचा हट्टच धरला आणि तो यशस्वीपणे खरा करून दाखवला.
आयुष्मान खुरानाचं यंदाचं वर्ष हे खास ठरलं आहे. आयुष्मान खुरानाचे 2019 मध्ये 'आर्टिकल 15', 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. या तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आयुष्मान सध्या 'शुभमंगल ज्यादा सावधान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'शुभमंगल सावधान' सिनेमाचा सिक्वल आहे. नुकतंच या सिनेमाचं पहिल्या शेड्युलचं शुटिंग बनारसमध्ये संपल आहे. या सिनेमासोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो सिताबो'मध्ये काम करत आहे.