सायली पाटील, झी मीडिया, मुंबई :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक : अनुभव सिन्हा 


निर्माते : अनुभव सिन्हा, झी स्टुडिओज 


मुख्य भूमिका : आयुषमान खुराना, इशा तलवार, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, झिशान आयुब 


 #Article15 
'मै और तुम इन्हे दिखाई ही नही देते.... ', हा संवाद वाचण्यासाठी जितका सोपा वाटतो तितकाच तो पाहताना आणि 'आर्टिकल १५' या चित्रपटातून कथानकाची साथ देताना प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा त्याची दाहकता अधिक चांगल्या पद्धतीने कळते. अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि गौरव सोलंकी, अनुभव सिन्हा लिखित या चित्रपटातून जितके तास आपण चित्रपटगृहात असतो त्यावेळी आता पुढे काय होणार हाच प्रश्न मनात घर करु लागतो. 


आव्हानात्मक आणि तितक्याच वास्तववादी भूमिका मोठ्या शिताफीनं हाताळण्याचं कसब आयुषमान खुरानाला चांगलंच अवगत आहे, हे चित्रपटातील प्रत्येक दृश्यातून सिद्ध होतं. त्याने साकारलेली आयपीएस अधिकारी अयान रंजनची भूमिका पाहताना खरंच आता समाजाला आणि सुरक्षा यंत्रणांना अशा अधिकाऱ्यांची गरज असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. 


बलात्कार, हत्या, समाजव्यवस्था, सामाजिक घटक आणि जातव्यवस्था यांचा आधार घेत उत्तर भारतातील खेड्यात कथानक पुढे सरकतं. त्याचवेळी आपण जगतोय खरे पण, ज्यावेळी आपण निवांत क्षमांचा आनंद घेत असतो तेव्हा या देशात असंख्य ठिकाणी, असंख्य गुन्हेही घडत असतात. कोणाचा जीव धोक्यात असतो, कोणाच्या अब्रूची हेळसांड होत असते, कोणाची असंख्य स्वप्न तुटत असतात आणि कोणावरतरी अत्याचार होत असतात या वास्तवाची झळ लागल्यावाचून राहात नाही. 


अनुभव सिन्हा यांनी कथानक अधिक प्रभावी करण्यासाठी  आणि त्यामध्ये अधिर जीवंतपणा आणण्यासाठी चित्रपटात अतिरंजरकपणा टाळला आहे ही बाब अत्यंत प्रशंसनीय. चित्रपटातील संवाद आणि प्रत्येक दृश्यातून समोर येणारे परिणाम पाहता 'आर्टिकल १५' बॉक्स ऑफिसवर एक वेगळी छाप सोडण्यासाठीच साकारण्यात आला आहे हे स्पष्ट होत आहे. 



चित्रपटात कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापासून ते अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक पातळीवर होणारा भ्रष्ठाचार, समाजव्यवस्थेमुळे सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरही त्याचे होणारे थेट परिणाम आणि जातीयवादामुळे निर्माण होणारी तेढ वारंवार चित्रपटातून अधोरेखित करण्यात आली आहे. कोणत्याच जातीवर चित्रपटातून निशाणा साधण्यात आलेला नाही. पण, जातीच्या याच मुद्द्यावरुन होणारी दुष्कृत्य कुठेतरी थांबली गेलीच पाहिजे ही आर्त हाक मारली गेल्याचं प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेतून आणि 'आर्टिकल १५'च्या प्रत्येक दृश्यातून पाहायला मिळतं.


एक गडद छटा असणारं कथानक पाहता चित्रपटात पार्श्वसंगीताचीही कमाल जाणवते. त्यातही टीपण्य़ात आलेले असंख्य बारकावे पाहता, चित्रपट साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा हेवाही वाटतो. आर्टिकल १५मध्ये अभिनेत्री सयानी गुप्ता पुन्हा एकता तिच्या अभिनय कौशल्याची छाप सोडून जाते. 


एक आयपीएस अधिकारी असूनही आपल्याच सुरक्षा व्यवस्थेत रुजू असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येजी जातपात, समाज या गोष्टींचा असणारा पगडा पाहता आयुषमानच्या चेहऱ्यावर येणारी प्रत्येक भावमुद्रा ही जणू काही आपल्यालाच चिंतातूर करुन जाते, वारंवार हा हे चित्र बदलणार कधी याच प्रश्नांनी उकल करण्यास भाग पाडते. हे प्रश्न आणि जातव्यवस्थेच्या विळख्यात गुदमरलेल्या हतबल समाजाला दिलेली सणसणीत चपराक म्हणजे 'आर्टिकल १५'.


-सायली पाटील


(SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com)