`बाहुबली 2` मधील अभिनेता वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात; फोटो तुफान व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. इंस्टाग्रामला आपल्या पत्नीसह फोटो शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. सुब्बाराजूने 'बाहुबली 2' चित्रपटात कुमार वर्माची भूमिका निभावली होती. सुब्बाराजूने इंस्टाग्रामला आपल्या नवविवाहित वधूसह फोटो शेअर करत लग्न केल्याची घोषणा केली आहे. फोटोत दोघेही पारंपारित वेषात दिसत आहेत. नववधू सोनेरी जरीच्या भरतकामासह लाल रेशमी साडीत सुंदर दिसत आहे, तर सुब्बाराजू हस्तिदंती धोतर आणि कुर्तामध्ये डॅशिंग दिसत आहे. नववधूने यावेळी फुलांचा गजरा आणि दागिने परिधान केले आहेत. तसंच सारखाच काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. फोटोमध्ये ते समुद्रकिनारी उभं असल्याचे दिसत आहे. कॅप्शनमध्ये सुब्बाराजूने लिहिलं आहे की, “Hitched Finally!!!”
सुब्बाराजूच्या पोस्टवर दाक्षिणात्य कलाकार व्यक्त झाले असून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये दिग्दर्शक हरीश शंकर यांनी लिहिलं आहे की, "अभिनंदन सुब्बाराजू... सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा." अभिनेता अभिनय कृष्ण पुढे म्हणाला, “अखेर!!!! अभिनंदन अण्णा."
आंध्र प्रदेश येथील भीमावरम येथील सुब्बाराजू यशस्वी अभिनेत्यांमध्ये गणला जातो. त्याची चित्रपटातील कारकीर्द अविश्वसनीय आहे. चित्रपट निर्माते कृष्णा वामसी यांनी संधी दिल्यानंतर त्याने खडगममधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. 2003 मध्ये पुरी जगन्नाधच्या अम्मा नन्ना ओ तमिला अममयी या चित्रपटाने त्याला खरी ओळख दिली. या चित्रपटात रवी तेजा आणि असिन मुख्य भूमिकेत होते.
त्यानंतर सुब्बाराजूने आर्या, पोकिरी, बिल्ला, खलेजा आणि इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 'बाहुबली: द कन्क्लूजन' या लोकप्रिय चित्रपटातील कुमार वर्माच्या भूमिकेने सुब्बाराजूला देशव्यापी ओळख मिळाली. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होते.
सुब्बाराजूने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने वेगवेगळ्या प्रकारची अनेक पात्रं साकारली आहेत. बुढ्ढा होगा तेरा बाप, टेम्पर, लीडर आणि मिर्ची यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या भूमिका आजही चाहत्यांच्या पसंतीस आहेत. त्यांच्या नावावर 100 हून अधिक चित्रपट आहेत. 2024 मध्ये आलेल्या जितेंद्र रेड्डी चित्रपटात तो अखेरचा दिसला होता.