मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता प्रभास आता लवकरच 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. साहो या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली होती. किंबहुना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. पण, आता मात्र यात अडथळा आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुप्रतिक्षित साहो १५ ऑगस्ट या तारखेला प्रदर्शित होणार होता. पण, आता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ३० ऑगस्ट करण्यात आली आहे. तब्बल पंधरा दिवसांनीही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 


१५ ऑगस्ट या दिवशी तेलुगू चित्रपटसृष्टीत 'रणरंगम' आणि 'एवारु' असे दोन तगडे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांशी होणारी टक्कर आणि त्याच्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेत साहोच्या निर्माते आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. 



चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. साहो चित्रपटाविषयी गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. तब्बल ३०० कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चात हा चित्रपट साकारण्यात आला आहे. 



सुजिथ लिखीत आणि दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीसाठी व्ही. वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद उप्पालपटी आणि भूषण कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर हिच्याव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, वेनेला किशोर, मुरली शर्मा, अरुण विजय, प्रकाश बेलावदी, चंकी पांडे हे कलाकारही झळकणार आहेत.