मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता प्रभास हा प्रेक्षकांच्या मनामनात घर करुन गेला. फक्त प्रभासच नव्हे तर चित्रपटातील इतरही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी अशी छाप पाडली. त्यातीलच एक नाव म्हणजे 'भल्लाल देव' ही भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती. चित्रपट निर्मिती आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये नावाजलेला राणा हिंदी चित्रपविश्वातही चांगलाच लोकप्रिय आहे. तो सध्या चर्चेत आला आहे ते म्हणजे एका मुलाखतीमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणाने दिलेली मुलाखत ही विविध मुद्द्यांना वाचा फोडून गेली. शिवाय चित्रपविश्वाविषयी असणाऱ्या बऱ्याच संकल्पना राणाने अगदी सहजपणे सर्वांसमोर ठेवल्या. मग ते घराणेशाहीविषयीचं मत असो किंवा विविध ठिकाणच्या, राज्यांच्या चित्रपटसृष्टींमध्ये असणारा फरक असो. 


मुळात संपूर्ण देशभरात विविध राज्याच्या अनुषंगाने चित्रपटसृष्टीचेही विभाग करणं ही बाबच पटत नसल्याचं म्हणत राणाने परखडपणे आपली भूमिका मांडली. 'तू विविध कलाविश्वांत काम करतोस, या कामाच्या अनुभवाविषयी कसं वाटतं?', असा प्रश्न विचारला असता, 'भारतीय खरंच मुर्ख आहेत आणि हा मूर्खपणा पाहून मलाच अनेकदा आश्चर्य वाटतं' असं उत्तर देत राणाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुख्य म्हणजे त्याच्या या उत्तराला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 


'कॅमेरा, कथा आणि कलाकार हे एकसारखेच असतात. मी तेलुगू भाषेत बोललो तर चित्रपट तेलुगू, हिंदीत बोललो तर चित्रपट हिंदी आणि इंग्रजीत बोललो तर चित्रपट इंग्रजी..... बस हेच होतं', असं राणा म्हणाला. जगाच्या पाठीवर आपणच या कलाविश्वाचा विभागलं असल्याचं खंत त्याने मांडली. तेलुगू, हिंदी वगैरे वगैरे अशी विभागणी आपणच केली आहे, असं म्हणत उदाहरण कोणत्याची चित्रपटसृष्टीचं घ्या त्यात चित्रपटच साकारले जातात ही वस्तूस्थिती त्याने या मुलाखतीत मांडली. 


कलाविश्वात तोपर्यंत कोणतंही अंतर किंवा मुळात कोणत्याही सीमा नसतात जोपर्यंत त्या असल्याची जाणिव करुन दिली जात नाही किंवा त्या आखल्या जात नाहीत, असं म्हणत राणाने विभागणी करण्याच्या या वृत्तीचा एका अर्थी निषेध केला. 
चित्रपटांमधील भूमिकांविषयीसुद्धा त्याने या मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय चित्रपट निर्मिती प्रक्रियेविषयीची काही गणितंही सर्वांसमोर मांडली. राणाची ही मुलाखत सोशल मीडियावर आणि संपूर्ण कलाविश्वात चांगलीच चर्चेत आली आहे. कलाकारांना आसरा देणाऱ्या या अनोख्या जगताविषयी असणारी त्याची आपुलकीची भावनाही या मुलाखतीतून व्यक्त झाली.