बाजी हिराला ओळखून शिक्षा देईल का?
काय करणार हिरा
मुंबई : बाजी या झी मराठीच्या नवख्या मालिकेच्या २० ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात बाजी आणि शेरापासून झाली. शेरा बाजीच्या हातून निसटून जातो आणि हिरा बाजीच्या कचाट्यात सापडते. वेषांतर केलेल्या हिराला हार चोर खेळणीवाली समजून बाजी तिला पकडण्यासाठी तिचा पाठलाग करतो. दरम्यान अचानक दुसऱ्या मार्गाने जाऊन हिराच्या पुढ्यात उभा राहतो आणि आपली तलवार तिच्या मानेवर रोखून चेहरा दाखवण्यास सांगतो. हिरा आपला चेहरा दाखवणार एवढ्यात शेराच्या तलवारीच्या घावाने घायाळ झालेला बाजी हिरासमोर चक्कर येऊन जमिनीवर पडतो. दुसरीकडे नासिर गावातील वैद्याला घेऊन पडक्या वाड्यात जातो जिथे वैद्याला बिनीवाले सरदार ही नजरेस पडतो. नासिर वैद्याला शेराला बाजीमुळे झालेल्या घावावर इलाज करण्यासाठी घेऊन येतो.
शेराला आणि त्याला झालेला घाव बघून वैद्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. तेव्हा वैद्य विचारतो आपल्याला ही जखम कशी झाली व कोतवालीतून असा हुकूम आहे की संशयीतांवर इलाज करायचा नाही परंतु सरदार बिनीवाले आहेत तर मी इलाज करतो पण, जर का कोतवालीत चौकशी झालीच तर बिनीवाल्यांनी जबाब द्यावा असे वैद्य धीटपणे म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून बिनीवाले फारच घाबरून जातो. दरम्यान शेराच्या घावांवर लेप लावून गेलेल्या वैद्याला शेराचा शिपाई जंगलात सोडायला जाण्याचे नाटक करून मारून टाकतो. तिकडे बेशुद्ध पडलेल्या बाजीच्या काळजीने हिरा व्याकुळ होऊन रडू लागते.
काही वेळाने रानपाल्याचा लेप बाजीला झालेल्या जखमेवर लावून आपल्या साडीच्या कपड्याने बाजीची जखम गुंडाळले. परंतु आता बाजीला कोतवाली पर्यंत कसे न्यायचे हा प्रश्न तिला पडतो. एवढ्यात बाजीचा घोडा जोराने आवाज करतो आणि हिराला युक्ती सुचते. मग हिरा बाजीला घोड्याच्या पाठीवर टाकून घोडा कोतवालीच्या दिशेने सोडते. बाजीला झालेली जखम बाजीच्या जीवावर बेतेल का आणि बाजीला घोड्यासह कोतवालीकडे सोडताना हिराला कुणी पाहिले असेल का ते पाहण्यासाठी बाजी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.