`बाईपण भारी देवा`ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट
प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन दीड महिना उलटून गेलाय तरी अनेकांना या चित्रपटाचं वेड आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग्स आणि त्याचसोबत गाणी व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. सगळीकडे सोशल मीडियावर फक्त 'बाईपण भारी देवा' आपल्याला पाहायला मिळतयं. या चित्रपटानं सगळ्यांची फक्त मने जिंकली नाही तर त्यासोबत चित्रपटानं एक वेगळा रेकॉर्ड केला आहे.
प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे.
अनेक चित्रपटांचे रेकॉर्डस् मोडत आता 76व्या स्वातंत्र्यदिनी बाईपण भारी देवाने ही 76.05 चा आकडा पार करत मराठी चित्रपटाचा विजयी झेंडा तर फडकवला आहेच, आणि याच बरोबर हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते मुंबई पोलिस या सगळ्यांनीच भरभरुन केलेले कौतुक तसेच जगभरातील मायबाप प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादामुळे आज बाईपण भारी देवाची यशस्वी घोडदौड अजूनही तितक्याच गतीने सुरू आहे.
आता तर निर्मात्यांनी सिनेमाच्या तिकीटावर घट करून फक्त 100 रुपये केल्यामुळे दर्शक नव्या जोमाने पुन्हा पुन्हा जावून चित्रपट बघण्याचा आनंद लुटत आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळते.