मुंबई : बाप म्हणजे धाक..  बाप म्हणजे कडक शिस्त..  बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.दिग्दर्शक मकरंद माने यांचा 'बापल्योक' हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायेचा हात डोक्यावर ठेवणारा,  कुटुंबाला आधार देणारा 'बाप' सोबत असला तरी ज्याच्या आशिर्वादाची आपल्याला सदैव गरज असते, तो म्हणजे आपला लाडका गणपती 'बाप्पा'. लवकरच गणपती 'बाप्पा'चं आगमन होणार आहे पण त्याआधी १ सप्टेंबरला रसिक दरबारात दाखल होणाऱ्या 'बापल्योक' चित्रपटाला गणपती बाप्पाचा कृपाआशिर्वाद मिळावा म्हणून चित्रपटाची संपूर्ण टीम पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाली होती. अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे, अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे याप्रसंगी उपस्थित होते. 'बापल्योक' या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे. 


कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे नेहमी दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खस्ता खात असतो. बापाची 'माया' आपल्या कवितेतून व्यक्त करताना 'बापल्योक'  चित्रपटातील अभिनेते शशांक  शेंडे यांनी सादर केलेली  'बाप म्हणजे काय? 'बाप म्हणजे जगण्याचं माप आहे …  पाठीवरची थाप आहे', या आशयाची कविता  सध्या चांगलीच गाजतेय.   


वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ  आगामी 'बापल्योक'  या चित्रपटातून साधला आहे. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. येत्या शुक्रवारी 'बापल्योक' आपल्या भेटीला दाखल  होत आहेत.