मुंबई : 'बारायण' असं हटके नाव असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांसमोर आले... त्यानंतर आता या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय वेगळ्या नावामुळे आणि पोस्टर वरील विशालकोन, पेन्सिल, ओरीगामी कागद, आलेख पेपर या शैक्षणिक साहित्यामुळे या चित्रपटात नक्की काय असावे? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे. 'बारायण' हा शब्द कोणत्याही बोलीभाषेत प्रचलित नाही, तसेच तो कुठल्याही शब्दकोशात आढळत नाही, मग हा चित्रपट आपल्या शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करतोय का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.


पोस्टरच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक साहित्याकडे लक्ष वेधण्यात आले त्याच्या पुढचा टप्पा 'बारायण'च्या मोशन पोस्टर मध्ये दिसतो... तो म्हणजे इयत्ता दहावी नंतर सुरू होणाऱ्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या विद्याशाखा आणि येणारे बारावीचे वर्ष... म्हणजेच 'बारायण' हा चित्रपट कोणत्याही घरातील विद्यार्थी आठवीत असतानाच १२ वी चे वेध लागतात त्यासंदर्भात पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा आहे. 


दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या 'ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'च्या  'बारायण' या चित्रपटाचे मोशन पोस्टर बघितल्यावर नारदमुनींच्या 'नारायण, नारायण' याशब्दांशी साधर्म्य असणारे 'बारायण, बारायण' हे शब्द शाळेत जाणाऱ्या आणि इयत्ता बारावीत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात आता ऐकू येतील यात शंकाच नाही.


'बारायण' हा मराठी चित्रपट राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.