मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणारा '२.०' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकिकडे पहाटे चार वाजल्यापासूनच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केलेली असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटाच्या वाटेत अडचणी आल्याचंही स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) कडून सेन्सॉर बोर्डाकडे धाव घेण्यात आली असून, या चित्रपटाचा विरोध करत सेन्सॉरक़डून देण्यात आलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


मोबाईल फोन आणि दूरसंचार क्षेत्राचं या चित्रपटातून करण्यात आलेलं चित्रण हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे COAI कडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मोबाईल फोन्स आणि मोबाईल टॉवर्स कशा प्रकारे सजीव प्रजातींना घातक आहेत, याचं चित्रण चित्रपटातून करण्यात आलं आहे. 


खिलाडी कुमार आणि रजनीकांत यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला सेन्स़ॉरकडून यू/ए प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. पण, आता ते प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याशिवाय या चित्रपटाच्या प्रमोशनल व्हिडिओसाठीचं प्रमाणपत्रही लगेचच मागे घ्यावं ही त्यांची मागणी आहे. 



तेव्हा आता याविषयी सेन्स़र काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Lyca Productions या बॅनरअंतर्गत साकारलेल्या '२.०' या चित्रपटाचा निर्मिती खर्च ५४३ कोटींच्या घरात असल्याचं कळत आहे. सर्वाधिक निर्मिची खर्च असणारा हा चित्रपट जवळपास ७००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असून, एकूण १४ भाषांमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.