मुंबई : जेव्हा दोन मोठे कलाकार एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा असतात. मुख्य म्हणजे या अपेक्षा म्हणण्यापेक्षा कलाकारांवर ते एक प्रकारचं ओझंच असतं. याच अपेक्षाचं ओझं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर घेत एक अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट म्हणजे '2.0'. जवळपास ५५० कोटींच्या निर्मिती खर्चातून साकारण्यात आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकता प्रदर्शित करण्यात आला. 


बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आता चिट्टी रोबोटचं रिलोडेड व्हर्जन पाहण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये खिलाडी कुमारची खलनायकी भूमिका पाहायला मिळत असून, मोबाईचा अती वापर करणाऱ्यांवर या ट्रेलरमधून निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. आता हे सारं नेमकं का सुरू आहे याचं उत्तर जरी चित्रपटातून मिळणार असलं तरीही सध्याच्या घडीला ट्रेलर पाहून तर्क लावण्यास काहीच हरकत नाही. 


व्हिएफएक्सची नवी पातळी आणि दिग्दर्शनाची नवी उंची या चित्रपटाच्या निमित्ताने पाहता येणार आहे. त्याशिवाय खिलाडी कुमार आणि रजनीकांत अशा दोन लोकप्रिय अभिनेत्यांची जुगलबंदी चित्रपटाला चार चाँद लावण्याचं काम करणार आहे. 



भारतातील सर्वात महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक निर्मिती खर्च असणारा दुसऱ्या क्रमांकावरचा हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर काही विक्रम मोडणार का, किंवा नवे विक्रम प्रस्थापित करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.