अभिनेता सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; केली मोठी घोषणा
अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आत्तापर्यंत सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
मुंबई : मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आज ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच आजच्या या विशेषदिनी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांनी १ नोव्हेंबर रोजी चित्रपट "संगीत मानापमान" प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या नाटकाला आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित, भव्यादिव्य संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर केले आहे.
या चित्रपटातील प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून त्याचप्रमाणे या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील सुबोध भावे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "संगीत मानापमान" हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांत प्रदर्शनास सज्ज होणार आहे.
नुकतीच सुबोध भावेनं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सुबोधने सिनेमाचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं की, ''आज मराठी संगीत रंगभूमी वरील एक सोन्याचे पान असलेल्या 'संगीत मानापमान' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ११३ वर्षे पूर्ण झाली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आजच्या दिवशी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून, सादर करीत आहोत, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित एक संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान!' 1 नोव्हेंबर 2024,दिवाळी च्या शुभमुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित.''
अनेकांनी सुबोधच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय, कट्यार काळजात घुसली सारखाच हा ही चित्रपट हिट होणार 100%. तर अजून एकाने लिहीलंय, वाह.. शुभ दिवस, पुन्हा दिवाळी, दादा, निखिल सर योग... तर अजून एकाने लिहीलंय, मानापमान पाहण्याची खूप उत्सुकता. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया सुबोधच्या या पोस्टवर चाहते देत आहेत.