Bigg Boss Ott Season 3 Update : भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून 'बिग बॉस'कडे पाहिले जाते. छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलाकार मंडळी ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्यात काही ना काही टास्क दिले जातात आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व कलाकार हे प्रयत्न करताना दिसतात. 'बिग बॉस हिंदी' या कार्यक्रमाचा प्रवास 17 व्या पर्वापर्यंत पोहोचला आहे. तर 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाचे दोन पर्व आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर आता 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाबद्दलची अपडेट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस ओटीटी'चे आतापर्यंत दोन पर्व प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यातील पहिले पर्वाचे सूत्रसंचालन करण जौहरने केले होते. तर दुसऱ्या पर्वाचा सूत्रसंचालक म्हणून सलमान खान झळकला होता. 'बिग बॉस ओटीटी'चे पहिले पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव ठरला होता. यानंतर आता लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चे तिसरे पर्व येणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या मे महिन्यापासून हा कार्यक्रम सुरु होईल, असे बोललं जात होतं. पण आता याबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. त्यानुसार यंदा 'बिग बॉस ओटीटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. 


...म्हणून यंदा 'बिग बॉस ओटीटी' कार्यक्रम नाही


इंडियन एक्सप्रेस या वेबसाईटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा 'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम करण्याबद्दल निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची तयार करण्यात आलेली नाही. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमाने यंदा 'बिग बॉस ओटीटी' हा कार्यक्रम करायचा नाही, असे ठरवले आहे. कारण या कार्यक्रमाचे प्रेक्षक लागोपाठ 'बिग बॉस'चे पर्व पाहून कंटाळले आहेत. त्यामुळे थोड्या महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर नवीन पर्व सुरु करायचे, असा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 


'बिग बॉस 17' हे पर्व जानेवारीत संपले. मुन्नवर फारुकी हा या कार्यक्रमाचा विजेता ठरला. त्यानुसार 'बिग बॉस 17' आणि 'बिग बॉस ओटीटी' यांच्यातील कालावधी फारच कमी आहे. त्यामुळे 'बिग बॉस ओटीटी 3' यंदा प्रदर्शित होणार नाही. पण याबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे. कलर्स आणि जिओकडून याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


अद्याप स्पर्धकांच्या नावाची अधिकृत घोषणा नाही


दरम्यान 'बिग बॉस ओटीटी' हा कार्यक्रम 15 मे नंतर सुरु होणार असल्याचे बोललं जात होतं. या कार्यक्रमात शिझान खान, अरहान बहल, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, दलजीत कौर, मॅक्सटर्न, श्रीराम चंद्रा, धनश्री वर्मा हे कलाकार झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.