नवी दिल्ली : वीर-झारा, कल हो ना हो, कोई मिल गया, कभी अलविदा ना कहना, यांसारख्या चित्रपटातून झळकलेली सुंदर, निरागस चेहऱ्याची अभिनेत्री प्रिती झिंटा. तिच्या गालावरील खळीने तर अनेकांचे मन जिंकले. आज प्रितीचा वाढदिवस आहे. बॉलिवूडबरोबरच तिने तेलगू, तामिळ आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतही आपले नाव कमावले आहे. प्रितीला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी दिल से साठी सर्वोत्कृष्ठ नवपर्दापणातील फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर २००३ मध्ये आलेल्या कल हो ना हो चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


प्रितीचे पूर्वायुष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रितीचा जन्म ३१ जानेवारी १९७५ मध्ये हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला. तिचे वडील दुर्गानंद झिंटा सैन्यात अधिकारी होते. तिच्या आईचे नाव नीलप्रभा आहे. मात्र ती १३ वर्षांची असताना तिचे पितृछत्र हरपले. एका कार दृर्घटनेत तिच्या वडीलांचा मृत्यू झाला. या धक्क्यामुळे तिची आई आजारी पडली आणि २ वर्ष अंथरूणाला खिळली. अन् कोमल वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. प्रितीला दोन भाऊ आहेत- दीपांकर आणि मनिष. मोठा भाऊ दीपांकर सैन्यात अधिकारी आहे. तर लहान भाऊ मनिष कॉलिफोर्नियाला सेटल आहे.


प्रितीने तिचे प्राथमिक शिक्षण कॉन्वेंट ऑफ जीजस अँड मेरी बोर्डिग स्कूलमध्ये पूर्ण केले आहे. बोर्डीगं स्कूलमध्ये तिला चांगले मित्र भेटले. प्रिती एक हुशार विद्यार्थी होती. तिला साहित्याची आवड होती. बास्केटबॉल खेळणे हा तिचा छंद होता. तिने सेंट बेडेज कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मानसशास्त्रात एमए केले. 


या एका प्रसंगाने बदलले तिचे आयुष्य


त्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये आपले नशिब आजमावले. त्याचवेळी एका मित्राच्या बर्थडे पार्टीत तिची ओळख एका दिग्दर्शकाशी झाली. त्यांनी तिला त्यांच्या जाहिरातीत काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जाहिरात क्षेत्रातील तिचा प्रवास सुरू झाला. त्यातील लिरिल साबण आणि पर्क चॉकलेट या गाजलेल्या जाहिराती,


तिच्या चित्रपट करिअरला शेखर कपूरच्या 'तारा रमपमपम' या चित्रपटातून होणार होती. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट रखडला. त्यानंतर प्रितीला दिल से चित्रपटात साहाय्यक अभिनेत्रीचे काम मिळाले. या चित्रपटात फक्त २० मिनिटे ती पडद्यावर झळकली. मात्र तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि त्यानंतर तिला प्रमुख भूमिकांसाठी ऑफर येत गेल्या. 


यानंतर तिने 'संघर्ष', 'मिशन कश्मीर', 'अरमान', 'फर्ज', 'ये रास्ते प्यार के', 'कोई मिल गया', 'दिल चाहता है', 'सलाम-नमस्ते', 'कभी अलविदा ना कहना', 'दिल से', 'इश्क इन पेरिस', 'क्या कहना', 'दिल है तुम्हारा' यांसारख्या चित्रपटात काम केले. २०१५ मध्ये नच बलिये या लोकप्रिय डान्स रियालिटी शो मध्ये ती जज म्हणून दिसली. सध्या ती किंग्स इलेवन पंजाब या आयपीएल संघाची सह-मालकीन आहे.