अनुष्का शेट्टी नव्हे, `या` अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता प्रभास
जवळपास दीड वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या नात्यात आला होता दुरावा
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच 'बाहुबली' आणि 'साहो' या चित्रपटांमुळे सर्वच स्तरांतील प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रभासने राज्य केलं. चित्रपटांसोबतच कायमच त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं.
एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून वावरणारा प्रभास तसा मितभाषीच. अशा या मितभाषी प्रभासचं नाव अभिनेत्री आणि 'बाहुबली' या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्यासोबत अनेकदा जोडलं गेलं.
किंबहुना त्यांच्या लग्नाच्याही बऱ्याच चर्चांनी मध्यंतरी जोर धरला होता. पण, या दोघांनीही कायमच आपल्यात फक्त मैत्रीचं नातं असल्याचं सांगितलं. एकिकडे अनुष्का आणि प्रभासच्या नात्याकडे चाहते नजर लावून बसलेले असतानाच आता प्रभासच्या एका जुन्या प्रेमप्रकरणाची माहिती समोर आली आहे. अनुष्का नव्हे तर, त्याने एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट केल्याचं म्हटलं जात आहे.
प्रभाससोबत नाव जोडलं जाणारी ती अभिनेत्री आहे, काजल अग्रवाल. काजल आणि प्रभासने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं आहे. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर या दोघांच्या केमिस्ट्रीने खऱ्या आयुष्यातही चांगलाच तग धरला होता. असं म्हटलं जातं की, प्रभास आणि अनुष्का यांचं प्रेमप्रकरण जवळपास १८ महिने म्हणजेच दीड वर्षापर्यंत चाललं.
असं म्हटलं जातं की, एकमेकांना समजून घेत त्यांचं हे नातं बहरलं होतं. पण, पुढे याच नात्यात काही अडचणी आल्या आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. काजल किंवा प्रभास दोघांपैकी कोणीही त्यांच्या या नात्याविषयी कधीच कोणतीही बाब उघड केली नाही.
नात्यात दुरावा आला असला तरीही या दोघांनी त्यांच्या कामाची कायमच प्रशंसा केली आहे. 'साहो' या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी काजलने प्रभासने ज्या वेगाने त्याच्या कारकिर्दीत उंची गाठली आहे, त्याबद्दल त्याची स्तुती केली. तर, 'साहो'च्याच प्रसिद्धीदरम्यान, ज्यावेळी प्रभासला काजलविषयीचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती एक खुप चांगली अभिनेत्री असल्याचं तो म्हणाला होता. प्रेमाच्या नात्यात हे दोघं एकत्र नसले तरीही अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत मात्र ते कायम एकमेकांच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.