अमिताभ बच्चन यांच्यासमोर नवा वाद
बीग बींच्यासमोर अडचणींची भिंत
मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग पाडण्यात मुंबई महानगरपालिका अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. काँग्रेसने बीएमसीच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.
रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग तोडणं गरजेचं असल्याचा अहवाल जुलै महिन्यात सीटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र तरीदेखील बिग बींच्या बंगल्याच्या भिंतीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी 'प्रतिक्षा'चा काही भाग पाडण्यात येणार आहे
या वर्षी 2 जुलै रोजी नोटीस पाठवल्यानंतर चार वर्षांनी बीएमसीने बंगल्याची भिंत पाडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. 2017 मध्ये, बीग बींच्या कुटुंबाला लिंकिंग रोडवरील बंगल्यातील जमिनीचा काही भाग देण्यास सांगण्यात आलं. प्रतीक्षा बंगल्यापासून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीएमसीने हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. योजनेअंतर्गत संत ज्ञानेश्वर रस्त्याचं ४० ते ६० फूट रुंदीकरण करायचं आहे.
बंगल्याला लागून असलेली हद्द 2019 मध्ये पाडण्यात आली
2019 मध्ये, बीएमसीने बंगल्यालगतच्या परिसराची भिंत पाडली होती. मात्र, प्रतीक्षाचा परिसर अस्पर्शित राहिला. काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी बीएमसीच्या के पश्चिम प्रभागात हा मुद्दा उपस्थित केला होता. मिरांडा यांनी आरोप केला होता की, दुसरी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी, बीएमसी बच्चन यांच्या मालमत्तेचं अधिग्रहण करण्यास जाणीवपूर्वक विलंब करत आहे.