मुंबई : नाटक पाहायला गेलेला प्रेक्षक खरोखर पूर्ण नाटक शांतपणे पाहतो का? यावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अनेक कलाकारांनी नाटक सादर करताना प्रेक्षकांच्या मोबाईलमुळे त्रास होत असल्याचा संताप व्यक्त केला होता. अखेर कलाकारांना आणि खऱ्या नाटक प्रेमींना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या BMC Theaters  नाट्यगृहांमध्ये जॅमर Mobile Jammer बसवला जाईल, असे स्पष्ट केल आहे. प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांकडून मोबाईल फोनचा वापर होत असल्याने त्रास होतो, अशी तीव्र नाराजी नाट्यकलावंत सुबोध भावे, सुमीत राघवन, विक्रम गोखले यांनी व्यक्त केली होती. नाट्यगृहांमध्ये मोबाईल फोनचा वापर टाळण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी होत होती. ही मागणी  मान्य करत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे स्पष्ट केले आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे अभिनेते सुबोध भावे व सुमित राघवन यांनी स्वागत केले आहे. 


अनेकदा प्रेक्षक नाटक सुरू असताना मोबाईल वाजल्यास तो उचलतात आणि नाट्यगृहातच बोलत बसतात. याचा त्रास कलाकारांबरोबरच नाटक प्रेमींना देखील होतो. नाटक पाहताना रसभंग झाल्याचं अनेक प्रेक्षक देखील सांगतात. तसेच कलाकारांना देखील यामुळे त्रास होत असल्याचं अनेक कलाकारांनी वारंवार सांगितलं आहे. 


अखेर या त्रासापासून आता सुटका होणार आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिकेच्या सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव महापालिकेकडून आता मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाटक रसिकांना मनमुराद नाटकाचा आनंद घेता येणार आहे. महापालिकेच्या मालकीची दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह, मुलुंड, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली ही नाट्यगृहे आहेत. या ठिकाणी जॅमर बसवली जातील.