मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) काही दिवसांपूर्वीच त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत विमानतळावर दिसला होता. यावेळी मुलगी आराध्याही सोबतच होती. अभिषेक ऐश्वर्या आणि आराध्याला सोडण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या हाताला पट्टी बांधल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु यानंतर बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांना लिलावती रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं आणि चाहत्यांची चिंता वाढली. सुरुवातीला अभिषेक इथं रुटीन चेकअपसाठी वगैरे आला असाला अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण, त्यानंतर मात्र  त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आल्याचं समजलं. 


अखेर आता अभिषेक रुग्णालयात का गेला होता, याचा खुलासा झाला आहे. चेन्नई येथे अभिषेकच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. त्याचवेळी सेटवर चित्रीकरण सुरु असतेवेळी तो एका अपघाताला सामोरं गेला आणि त्यामध्येच तो दुखापतग्रस्त झाला. 


सूत्रांच्या माहितीनुसार अभिषेकच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून, यामध्ये फ्रॅक्चर आहे. चिंता करण्याचं कारण नसलं तरीही अभिषेकला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेक सध्या रुग्णालयातच उपचार घेत असून, त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं अद्यापही त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


अभिषेक बच्चन तमिळ चित्रपट ओर्था सेरुप्पु आकार 7 च्या हिंदी रिमेकसाठी चित्रीकरण करत होता. त्याचवेळी तो दुखापतग्रस्त झाल्याचं म्हटलं जात आहे. लक्ष देण्याजोगी बाब अशी, की अभिषेकच या चित्रपटाची निर्मितीही करत आहे. ज्यामुळं आता तोच रुग्णालयात असल्यामुळं काही काळ चित्रीकरणाचं काम लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.