बॉलिवूड सोडून राजकारणात येणार का? या प्रश्नावर अक्षय कुमार म्हणाला...
चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमारच्या चाहत्यांना त्याला राजकारणातही पाहायचे आहे.
Akshay Kumar: अक्षय कुमार बॉलिवूडमधील सुपरस्टार असून फिटनेसबद्दल नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमारच्या चाहत्यांना त्याला राजकारणातही पाहायचे आहे. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्याने तो चर्चेत आला. यासोबतच ट्विटरवर अनेक सामाजिक विषयांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त करतो. अशा परिस्थितीत अक्षय कुमार भविष्यात राजकारणात पाऊल ठेवणार का? असा प्रश्न अनेकवेळा त्याच्या चाहत्यांच्या मनात येतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आता खुद्द अक्षय कुमारने राजकारणात येणार की नाही? यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पॉल मॉल, लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित 'हिंदुजा आणि बॉलीवूड' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अक्षय कुमारला राजकारणात येण्याबाबत विचारले असता त्याने याबाबत खुलासा केला आहे. अक्षय कुमार म्हणाला, 'चित्रपट बनवताना मला खूप आनंद होत आहे. एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. मी व्यावसायिक चित्रपट करतो, पण कधी-कधी सामाजिक समस्यांशी निगडित चित्रपटही बनवतो. मी एका वर्षात 3-4 चित्रपट करतो.'
यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान राजकारणात येण्याच्या प्रश्नावर अक्षय म्हणाला होता की, 'राजकारणात कधीच येणार नाही, मी आनंदी आहे आणि आनंदी राहायचे मी केवळ चित्रपटांच्या माध्यमातून माझ्या देशासाठी योगदान देणार आहे. ते माझे काम आहे.' अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'रक्षा बंधन' 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या चित्रपटात भाऊ-बहिणीचे सुंदर नाते दाखवण्यात आले असून, यात प्रेमासोबतच खूप धमालही पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी दोघेही 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात एकत्र दिसले होते.