मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, प्रभावी व्यक्तीमत्व, भारदस्त आवाज आणि उत्तुंग कारकिर्दीच्या बळावर अमिताभ बच्चन यांनी वेगळी अशी ओळख तयार केली. त्यांनी आपलं असं राज्यं प्रस्थापित केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांच्या याच कामगिरीसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. कलाविश्वातील योगदानाने इतरांना सतत प्रेरणा देणाऱ्या या महानायकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच याविषयीती घोषणा करण्यात आली. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब करत एक ट्विटही केलं. ज्यामध्ये त्यांनी बच्चन यांचं अभिनंदन केलं होतं. 



बिग बींच्या नावे फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडिया आणि शक्य त्या सर्वच माध्यमांतून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. या साऱ्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांची यावर काय प्रतिक्रिया असणार? 


चाहत्यांची उत्सुकता जास्त ताणून न धरता त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आणि त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून अखेर बच्चन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. आपल्याला मिळणाऱ्या या शुभेच्छा पाहून, 'त्यावर नेमकं व्यक्त होण्यासाठी शब्दही कमीच पडत आहेत. मी कृतज्ञ आहे, तुम्हा सर्वांचे मी मनापासून विनम्रेतेने आभार मानतो', असं ते ट्विट करत म्हणाले. त्यांच्या या ट्विटला अनेक लाईक मिळाले, तर कित्येकांनी ते रिट्विटही केलं. 



'बिग बी', 'अँग्री यंग मॅन', 'महानायक' अशा विविध विशेषणांनी अमिताभ बच्चन यांना संबोधण्यात येतं. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात खास स्तान निर्माण केलं. हे सत्र आजतागायत सुरु आहे. प्रत्येक पिढीच्या नवख्या कलाकाराला टक्कर देणाऱ्या बच्चन यांच्यासोबत एकदातरी काम करण्याची संधी मिळावी हेच अनेक नवोदितांचं स्वप्न असतं. या पिढीचा उत्साह जपत त्यांना मार्गदर्शन करण्यातही अमिताभ बच्चन कायम पुढे असतात.