बिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....
विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन....
मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच अभिषेक बच्चन आणि सुन म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन हिला coronavirus कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. ज्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण, या साऱ्या परिस्थितीमध्ये रुग्ण म्हणून आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम झाल्याचं म्हणत बिग बींनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
एका ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी कोरोना विषाणू कशा प्रकारे रुग्णाच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम करतो याबाबत स्वानुभवातून काही गोष्टी लिहिल्या आहेत. विलगीकरणात असल्यामुळं गेल्या कित्येक आठवड्यांपासून कोणाला पाहिलंही नसल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.
'रात्रीच्या त्या अंधारात, खोलीच्या गारव्यामध्ये मी डोळे मिटण्याचा प्रयत्न करत गाणं गातोय. माझ्या आजूबाजुला कोणीच नाही', असं त्यांनी लिहिलं. कोरोनाच्या उपचारादरम्यान आपल्यावर होणाऱ्या परिणामांविषयी लिहिताना त्यांनी पुढं नमूद केलं, 'कोरोनाच्या उपचारासाठी व्यक्तीला आठवडेच्या आठवडे विलगीकरणात राहावं लागतं. त्यांना इतरांचे चेहरेही पाहता येत नाहीत. कारण त्यांच्यापाशी येणाऱ्या व्यक्ती सतत PPE किटमध्येच असतात. कोण कसं आहे, हेसुद्धा तुम्हाला कळत नाही. त्या किटमागे त्यांचे काय हावभाव आहेत, काहीही कळत नाही. सर्व सफेद लोकं, जणूकाही रोबोट. ते लिहिलेली औषधं देतात आणि निघून जातात. ते निघून जातात कारण जास्त वेळ थांबल्यास त्यांनाही संसर्गाचा धोका असू शकतो'. या साऱ्यामुळं मानसिक स्थैर्यही ढासळतं असं म्हणत मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयीसुद्धा त्यांनी लिहिलं.
विलगीकरणातून बाहेर आल्यावरही याचा शरीर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. मानसोपचारतज्ज्ञ सांगतात, रुग्ण बाहेर आल्यानंतर जास्त चिडचिडेपणा करतात. त्यांना यासाठी मदतही दिली जाते. जनमानसात गेल्यावर आपल्याला वेगळीच वागणूक तर मिळणार नाही ना, याची भीती त्यांना असते. रोगानं तुमचं शरीर सोडलं असलं तरीही ताप, पुढील ३-४ दिवसांसाठी मात्र कायम असतो, असं ते म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं जगभरात आलेल्या काही महत्त्वाच्या बदलांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून बिग बी स्वत: चाहत्यांना त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती देत आहेत. आता सर्वच चाहते त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना करुन ते लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन घरी परतावेत अशीच प्रार्थना करत आहेत.