मुंबई :  विविध विषयांना हाताळत त्यावर चित्रपट साकारणाऱ्या भारतीय कलाविश्वात सध्या राजकीय व्यक्तीमत्वांरील चित्रपटांवर जास्त भर दिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट विश्वात असणारं हे एकंदर वातावरण पाहता, या साऱ्याची चर्चा थेट केंद्रापर्यंतही जाऊन पोहोचली आहे. राजकीय पटलावर अनेकांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडणारा आणि सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरणारा हा चित्रपट म्हणजे 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी त्याचं कौतुक केलं, तर काहींनी मात्र त्यावर नाराजी व्यक्त केली. चित्रपटाविषयी येणाऱ्या या प्रतिक्रिया आणि विरोध लक्षात घेत खुद्द अभिनेते अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा ते या चित्रपटात साकारत आहेत. 


काँग्रेस कार्यकर्त्यांनी आळवलेला नाराजीचा सूर पाहून खेर यांनी सत्य बदलता येऊ शकत नाही, असा सूचक आणि बोचरा टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. २००४ ते २००८ या कालावधीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीला अतिशय जवळून पाहिलेल्या त्यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकातील मजकुराचा आधार घेत चित्रपटाचं कथानक साकारण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


'जर आपण, जालियनवाला बाग किंवा इतर कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करणारा चित्रपट साकारला असता तरीही त्यातील घटना आणि सत्य हे कधील बदलता येत नसतं. आम्हीही तेच केलं आहे', असं म्हणत डॉ. सिंग यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनेच ते पुस्तक लिहिलं होतं. त्यावेळी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एकतर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा अनेकांनीच त्याकडे पाठ फिरवली हा मुद्दा अधोरेखित केला. सोबतच तेव्हा ही परिस्थिती होती, मग आता हा विरोध आणि रडीचा डाव का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपण, या चित्रपटातील भूमिकेसाठी फार मेहनत केल्याचंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं. 



सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं म्हणत, महाराष्ट्र युवा काँग्रेसकडूनही या चित्रपटाचा विरोध होत आहे. त्याविषयीच व्यक्त होत खेर म्हणाले, 'काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी याचं एक ट्विट मी वाचलं होतं. ज्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी ते काही म्हणाले होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना आता त्यांनीच रागे भरलं पाहिजे.'



ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच प्रकाशझोतात आलेल्या या चित्रपटाविषयी सुरु होणाऱ्या या सर्व चर्चांना आता कोणतं नव वलण मिळणार की, हे वाद शमणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


#TheAccidentalPrimeMinister