जातीयवादावर भाष्य करणाऱ्या `आर्टिकल १५`ला अखेर यू/ए प्रमाणपत्र
चित्रपटात सुचवले काही बदल
मुंबई : समाजात रुजलेल्या जातीयवादाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या 'आर्टिकल १५' या चित्रपटाला अखेर सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आलं आहे. हा चित्रपट प्रमाणित करत असताना त्यात पाच बदलही सुचवण्यात आले आहेत.
अभिनव सिन्हा दिग्दर्शित आणि आय़ुषमान खुरानाची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच त्याच्या कथानकाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या वाटेत काही अडथळे आल्याचं पाहायला मिळालं.
सेन्सॉर बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या चित्रपटात सुचवण्यात आलेले बदल खालीप्रमाणे आहेत.
ध्वज आगीत पडतानाचं दृश्य दाखवू नये.
लैंगिकतेच्या मुद्द्यावर होणाऱ्या शिवीगाळीऐवजी 'साला' या शब्दाचा वापर करावा.
मारहाणीच्या दृश्यांपैकी एकूण ३० टक्के दृश्य कमी करावीत.
बलात्कार, जात व्यवस्था, समाजानेच निर्माण केलेली तेढ अशा परिस्थितीवर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आयुषमान खुराना 'आर्टिकल १५'च्या निमित्ताने पुन्हा एकदा आश्वासक भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून त्याला आणि प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत. आयुषमानव्यतिरिक्त या चित्रपटातून इशा तलवार, सयानी गुप्ता, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद झिशान आयुब हे कलाकारही झळकणार आहेत.
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्याचं पाहायला मिळालं होतं. करणी सेना आणि ब्राह्मण महासंघाकडून या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. ज्यामध्ये चित्रपटातील दृश्य आणि काही संवादांवर आक्षेप घेण्य़ात आला होता. इतकच नव्हे, तर यातून ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणतही चित्रपटाचा विरोध करण्यात आला होता.