Happy B`Day : वाढदिवसानिमित्त वडिलांच्या आठवणीने बिग बी भावूक
व्यक्त केली अशी इच्छा की....
मुंबई : हिंदी कलाविश्वात कित्येक वर्षे आपल्या अभिनयाच्या बळावर आणि अनोख्या अंदाजाच्या बळावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा रुबाब, उत्साह हा आजही अनेक नव्या जोमाच्या कलाकारांना लाजवेल असाच आहे. 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते हैं....' असं म्हणणारे बिग बी खऱ्या अर्थाने हिंदी कलाविश्वाचे 'शहेनशहा' आहेत.
बच्चन यंदाच्या वर्षी ७७ व्य़ा वर्षात पदार्पण करत आहेत. पण या वाढदिवसाच्या वेळी मात्र ते कोणताही गाजावाजा करु इच्छित नाहीत. 'ऑक्टोबरमध्ये एखादी गोष्ट साजरा करण्य़ामागचं असं कारण काय? हा एक सर्वसामान्य दिवसच असेल', असं म्हणत आपल्या उत्साहाला शरीराची साथ मिळत आहे आणि वयाच्या या टप्प्यावरही आपण अभिनय विश्वात सक्रीय आहोत याविषयी बच्चन यांनी देवाचे आभार मानले. सोबतच हितचिंतकांनी कोणत्याही प्रकारचा जल्लोष करु नये अशी विनंती त्यांच्याकडे केली.
एका मुलाखतीत सांगितलेल्या काही आठवणींनुसार वाढदिवसानिमित्त वडील कविता रचून ती आपल्याला ऐकवत असत, ही गोष्ट आणि त्या आठवणी आपल्याला सतावत असल्याचं म्हणज ते भावूक झाले.
''ही जणू कुटुंबातील एक परंपराच होती. पण, 'कुली' चित्रपटाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर ही परंपरा बदलली होती. चित्रीकरणादरम्यान जेव्हा मी जवळपास प्राण गमावले होते तेव्हा वडिलांनी माझ्या वाढदिवसाची कविता रचली. माझ्यासाठी ते एक नवं आयुष्य होतं. नवा जन्म होता. ती कविता वाचताना वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांना या परिस्थितीत मी पहिल्यांदाच पाहिलं होतं', असं ते म्हणाले. आजच्या घडीला आपल्यावा, वडिलांच्या त्या कविता आणि आईचा या खास दिवसानिमित्त असणारा उत्साह आठवतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ही आहेत बिग बींची अपूरी स्वप्न...
आयुष्याच्या या टप्प्यावर जीवनात असं एखादं स्वप्न आहे का, जे अद्यापही पूर्ण झालेलं नाही? या प्रश्नाच उत्तर देत अशी खूप स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. 'हो खूप स्वप्न आहेत. मला पियानो वाजवायचा आहे. मला खुप साऱ्या भाषा शिकायच्या आहेत. गुरु दत्त यांच्यासोबत मला काम करायचं होतं', असं ते म्हणाले.