मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देसभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAAविरोधी वातावरण तयार होताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कलाविश्वातील अनेकांनीच याप्रकरणी त्यांची मतं मांडली आहेत. यातच अभिनेता फरहान अख्तर यानेही काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. पण, हे ट्विट करणं त्याला चांगलंच महागात पडलं. देशाचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचं ध्यानात येताच अखेर आपली चूक लक्षात घेत फरहानने जाहीरपणे त्याबाबत माफी मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण केलेल्या ट्विटमध्ये वापरण्यात आलेला फोटो, मुळात त्यामध्ये असणारा भारताचा नकाशा चुकीच्या  असल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. सध्या सुरु असणारी आंदोलनं किती महत्त्वाची आहेत हे सांगत फरहानने येत्या १९ तारखेला सर्वांनाच मुंबईतील क्रांती मैदान येथे एकवटण्याचं आवाहन केलं आहे. 


फक्त समाज माध्यमांतून या आंदोलनांचं समर्थन करण्याची वेळ आता निघून गेल्याचं सूचक विधानही त्याने केलं. ज्यानंतर त्याने जाहीरपे आपली चूक कबूल करत दिलगिरी व्यक्त केली. मी नुकतंच १९ तारखेला होणाऱ्या एका सभेविषयीची माहिती पोस्ट केली होती. त्यासोबत सभेविषयीचं एक ग्राफीकही रिपोस्ट करण्यात आलं होतं. मी त्यामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक शब्दाबाबत ठाम आहे, असं त्याने स्पष्ट केलं. 



मुख्य म्हणजे आपली भूमिका ठाम असली तरीही त्यामध्ये भारताच्या नकाशाचं ग्राफीक चुकलं होतं हे त्याने स्वीकारलं. 'काश्मीरचा प्रत्येक इंच भाग हा भारताचाच आहे आणि मी तो चुकीचा नकाशा धुडकावतो. यापूर्वी हे लक्षात न आल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे', अशा शब्दांत फरहानने या वादग्रस्त मुद्द्यावर आपली बाजू मांडली. 




मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आल्यानंतर विविध प्रांतातून यावर विरोध केला गेला. या कायद्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निदर्शनंही काढण्यात आली. आंदोलनांना बहुतांश ठिकाणी हिंसक वळणही मिळालं. त्यावर आता अनेक स्तरांतून चिंता व्य़क्त केली जात आहे. असं असलं तरीही या कायद्याविरोधीतल सूर काही मावळलेला नाही.